KL Rahul Athiya Wedding – टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी काल विवाहबंधनात अडकले. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर हा लग्न सोहळा पार पडला. निवडक पाहुणे आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हे लग्न झालं. बऱ्याच महिन्यांपासून या विवाहाची चर्चा होती. अथिया सुनील शेट्टी यांची कन्या आहे. या लग्नासाठी निवडलेलं विवाहस्थळ, मेन्यू आणि कोण पाहुणे आले? याची मीडियामध्ये चर्चा आहे. विवाहातील महत्त्वाचा विधी असलेली सप्तपदी काल दुपारी पार पडली. यावेळी जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता.
पत्रकारांना मिठाईडे पुडे
लग्न लागल्यानंतर अभिनेता सुनील शेट्टी आणि त्याचा मुलगा अहान शेट्टी बाहेर आले. विवाहसोहळा कव्हर करण्यासाठी आलेले पत्रकार, फोटोग्राफर्सना त्यांनी मिठाईचे पुडे दिले. या लग्नाबद्दल माहिती देताना सुनील शेट्टी म्हणाला की, “हा खूपच सुंदर छोटेखानी विवाह सोहळा होता. जवळचे कुटुंबिय उपस्थित होते. सात फेरे झालेत. आता मी अधिकृत सासरा झालोय”
पत्रकारांचा सुनील शेट्टीला प्रश्न
सुनील शेट्टीला यावेळी पत्रकारांनी लग्नाच्या रिसेप्शनबद्दल प्रश्न विचारला. रिसेप्शन कधी होणार? त्यावर आयपीएलनंतर रिसेप्शन होईल, असं सुनील शेट्टीने सांगितलं. सध्या टीम इंडियाची न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज सुरु आहे. पण वनडे सीरीज आणि त्यानंतर होणाऱ्या T20 मालिकेसाठी राहुलची टीममध्ये निवड केलेली नाही. लग्नानंतर राहुल ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये खेळणार आहे.
बॉलिवूडमधून लग्नाला कोण हजर होतं?
केएल राहुलच व्यस्त क्रिकेट वेळापत्रक पाहता मे महिन्यात रिसेप्शनचा प्लान आहे. जेणेकरुन फिल्म इंडस्ट्री आणि क्रिकेट विश्वातील दिग्गजांना उपस्थित राहता येईल, असं जवळच्या मित्राने सांगितलं. फिल्म इंडस्ट्रीतून या लग्नाला अनुपम खेर, डायना पेन्टी, अंशुला कपूर, क्रृष्णा श्रॉफ आणि क्रिकेट विश्वातून इशांत शर्मा उपस्थित होता.
रिसेप्शन लांबणीवर जाणार?
केएल राहुल आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट सीरीज संपल्यानंतर आयपीएलची सुरुवात होईल. एकूणच वेळापत्रक पूर्णपणे व्यस्त असेल. त्यामुळेच राहुल-अथियाच्या लग्नाचा रिसेप्शन लांबणीवर गेलं आहे. क्रिकेट, बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहू शकतात.