मुंबई : 2020मध्ये बॅट निकामी झाली आणि 2021मध्येही ती शांत राहिली.. विराट कोहली(Virat Kohli)ची बॅट 2 वर्षांपासून तळपली नाही. जो खेळाडू क्रीजवर उतरताच धावांचा पाऊस पडत असे, ज्या खेळाडूसमोर मोठमोठे गोलंदाज घाबरायचे, आता त्याच खेळाडूला शतकाची आस लागलीय. गेल्या काही वर्षांत विराट कोहलीच्या बॅटनं आंतरराष्ट्रीय शतक (Century) ठोकलेलं नाही. विराटची अडचण वर्षाच्या शेवटच्या कसोटीतही कायम होती. सेंच्युरियन कसोटीच्या दोन्ही डावात विराट कोहली फ्लॉप ठरला होता.
अफलातून सल्ला
कोणत्याही फलंदाजाचा फॉर्म येत-जात राहतो पण विराट कोहली ज्या पद्धतीनं बाद होत आहे ते खरोखरच चिंताजनक आहे. विराटच्या या खराब फॉर्मबाबत माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय कसोटी कर्णधाराला अफलातून सल्ला दिलाय. सुनील गावसकर म्हणतात, की विराट कोहलीनं दिग्गज सचिन तेंडुलकरला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, तर त्याची समस्या दूर होऊ शकते.
त्यानं चौथ्या टेस्टमध्ये ठरवलं
सेंच्युरियन कसोटी संपल्यानंतर सुनील गावसकर यांनी विराट कोहलीला हा मजेशीर सल्ला दिला. सुनील गावसकर म्हणाले, की विराटनं सचिन तेंडुलकरला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तर खूप छान होईल. या संभाषणादरम्यान, तो सचिनला त्याचे ऑफ-साइड शॉट्स कसे थांबवायचे हे विचारू शकतो. 2003-04च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसं सचिननं स्वतः केलं होतं. सुनील गावसकर म्हणाले, की सचिन तेंडुलकरदेखील विराट कोहलीसारख्याच समस्येशी झुंजत होता. कव्हर्स आणि विकेटच्या मागे सचिन सतत आऊट होत होता आणि त्यानंतर चौथ्या टेस्टमध्ये सचिननं ठरवलं, की तो ऑफ साइडला शॉट्स खेळणार नाही. यानंतर चौथ्या कसोटीत सचिन तेंडुलकरनं नाबाद २४१ धावांची खेळी केली. सचिन तेंडुलकरशी बोलल्यानंतर विराट कोहलीला नक्की कळेल, की मास्टर ब्लास्टरनं हे कसं केलं?
सतत होतोय बाद
सेंच्युरियन कसोटीच्या दोन्ही डावात विराट कोहली बाहेर जाणार्या चेंडूंवर फटके मारत बाद झाला. विराट कोहलीनं पहिल्या डावात 10व्या स्टंपच्या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या डावात त्यानं 8व्या स्टंपच्या चेंडूशी छेडछाड करताना विकेट गमावली.
2021 ठरलं वाईट
2021 हे वर्ष विराट कोहलीसाठी खूप वाईट होतं. विराटनं 11 कसोटीत केवळ 28.21च्या सरासरीनं 536 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून फक्त 4 अर्धशतकं झळकली. 2021मध्येही विराट कोहलीची कसोटी सरासरी 20पेक्षा कमी होती. आशा आहे, की विराट कोहली नवीन वर्षापासून नवीन सुरुवात करेल आणि त्याचा शतकांचा दुष्काळ संपेल.