मुंबई: सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत (IPL) दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) आपल्या प्रदर्शनाने सर्वांचच मन जिंकून घेतलय. RCB साठी खेळताना दिनेश कार्तिक मॅच फिनिशरची भूमिका बजावतोय. त्याने स्वबळावर आरसीबीला (RCB) तीन सामन्यात विजय मिळवून दिला आहे. दिशेन कार्तिकला याच कामगिरीमुळे T 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान मिळू शकते. अनेक दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिकच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. “हा अनुभवी विकेटकीपर फलंदाज T 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका बजावू शकतो” असं भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. सिलेक्टर्सनी दिनेश कार्तिकच्या वयाकडे पाहू नये, असा सल्ला सुनील गावस्करांनी दिला आहे. दिनेश कार्तिक या सीजनमध्ये बिनधास्तपणे आपल्या संघासाठी धावा करतोय. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या या खेळाडूने आतापर्यंत 197 धावा केल्या आहेत.
दिनशे कार्तिक यंदाच्या सीजनमध्ये आतापर्यंत फक्त एकदाच आऊट झाला आहे. कार्तिकने या सीजनमध्ये 32, 14, 44, 7,34 आणि 66 रन्सची इनिंग खेळली आहे. त्याचा स्ट्राइक रेट 209.57 आणि सरासरी 197 आहे.
“दिनेश कार्तिकला स्वत:ला T 20 वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा आहे. मी एवढच म्हणेन की, तुम्ही त्याच्या वयाकडे पाहू नका. फक्त तो कशा पद्धतीचा खेळ करतोय ते लक्षात घ्या” असं सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाले. दिनेश कार्तिकने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात 34 चेंडूत नाबाद 66 धावांची खेळी करुन सामन्याची दिशाच बदलून टाकली. त्याने अनुभवी मुस्ताफिजुर रहमान आणि भारताचा युवा गोलंदाज खलील अहमद विरुद्ध सहजतेने धावा केल्या. आरसीबीने या सामन्यात कठीण परिस्थितीतून बाहेर येऊन 189 धावा केल्या. आरसीबीने हा सामना 16 धावांनी जिंकला. कार्तिकला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
“आपल्या प्रदर्शनाने दिनेश कार्तिकने मॅचची दिशाच बदलून टाकली. टी 20 वर्ल्ड कप मध्ये सहाव्या-सातव्या क्रमांकाच्या फलंदाजाकडून जी अपेक्षा असते तशीच कामगिरी दिनेश कार्तिक करतोय”, असं सुनील गावस्कर म्हणाले. दिनेश कार्तिक भारतासाठी 26 कसोटी, 94 वनडे आणि 32 टी 20 सामने खेळला आहे. कार्तिक भारतासाठी शेवटचा वनडे सामना 2019 च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता.