मुंबई: भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil gavaskar) सध्या क्रिकेट एक्सपर्टच्या भूमिकेत आहेत. कॉमेंट्री करताना मैदानावरील घटनांवर ते अगदी परखडपणे भाष्य करतात. मैदानात खेळाडू लवकर बाद झाला, मोक्याच्याक्षणी त्याने सोपा झेल सोडला, तर गावस्कर त्या खेळाडूवर कडाडून टीका करतात. भारताच्या दक्षिण आफ्रिरा दौऱ्यावेळी त्यांनी अजिंक्य रहाणेपासून (Ajinkya rahane) ते विराट कोहलीपर्यंत (Virat kohli) कोणालाही सोडलं नव्हतं. जिथे खेळाडू चुकला तिथे त्यांनी टीका केली होती. मागच्याच आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचं थायलंडमध्ये अकाली निधन झालं. त्यावेळी सुद्धा गावस्कर आपल्या नेहमीच्या शैलीत स्पष्टपणे बोलून गेले. पण त्यांचे ते शब्द अनेकांना पटले नाहीत. प्रत्येक गोष्ट बोलण्याची एक वेळ असते. गावस्करांची ती वेळ चुकली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर शोककळा पसरलेली असताना गावस्करांना त्यांच्या वक्तव्याबद्दल ट्रोल केलं गेलं. आता गावस्करांना आपल्या चुकीची उपरती झाली असून त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
खरंतर तो प्रश्नच विचारायला नको होता
“शेन वॉर्नला सार्वकालीन सर्वोत्तम लेगस्पिनर मानण्यास गावस्करांनी नकार दिला. त्यावरुन हा सर्व वाद झाला. खरंतर हा प्रश्न विचारायला नको होता आणि मी सुद्धा याच उत्तर देण्याची गरज नव्हती. तुलना किंवा मूल्यमापन करण्याची ती योग्य वेळ नव्हती” असे गावस्करांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे.
“शेन वॉर्न महान खेळाडूंपैकी एक आहे. जो खेळाला आणखी एक उंचीवर घेऊन गेला. रॉडनी मार्श एक उत्तम विकेटकीपर होते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो” असं आता गावस्कर यांनी म्हटलं आहे.
वाद नक्की काय आहे?
अँकरने सुनील गावस्करांना तुम्ही शेन वॉर्नला महान फिरकी गोलंदाज मानता का ? असा प्रश्न विचारला होता. त्यावर गावस्करांनी माझ्यासाठी शेन वॉर्नपेक्षा भारतीय स्पिनर्स आणि श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन श्रेष्ठ आहे, असं म्हटलं होतं. त्यावरुन हा सर्व वाद सुरु झाला. ऑस्ट्रेलिया मीडियाने सुनील गावस्कर यांच्यावर बरीच बोचरी टीका केली. अखेर गावस्करांनी व्हिडिओ पोस्ट करुन आपल्या वक्तव्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.