मुंबई: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) हे एखाद्या विषयावर स्पष्टपणे आपलं मत मांडतात. कॉमेंट्री करताना एखाद्या क्रिकेटपटूच्या कामगिरीचं विश्लेषण करताना ते खडेबोलही सुनावतात. अजिंक्य रहाणेपासून (Ajinkya Rahane) विराट कोहली (Virat kohli) पर्यंत कोणीही त्यांच्या शब्द बाणांमधून सुटलेला नाही. आता इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीजन सुरु आहे. गावस्कर नेहमीप्रमाणे समालोचन कक्षात दिसतात. दोन दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना झाला. त्यावेळी सुनील गावस्करांनी एका निर्णयावरुन राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसनला सुनावलं. राजस्थान रॉयल्सने त्या दिवशी रविचंद्रन अश्विनला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती दिली. त्यांनी अश्विनला वनडाऊन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. खरंतर त्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन फलंदाजीला येतो. संजू सॅमसन त्या सामन्यात फक्त चार चेंडू खेळला. एनरिख नॉर्खियाने त्याला सहा धावांवर बाद केलं. राजस्थानचा डाव निर्धारित 20 षटकात सहा बाद 160 धावांवर आटोपला.
हा सामना आठ विकेट आणि 11 चेंडू राखून दिल्ली कॅपिटल्सने जिंकला. दिल्लीकडून मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर यांच्यामध्ये दुसऱ्याविकेटसाठी 144 धावांची भागीदारी झाली. मार्शने 89 तर डेविड वॉर्नरने नाबाद 52 धावा फटकावल्या. या सामन्यात संजू सॅमसनचा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचा निर्णय गावस्करांना पटला नाही.
“संजू सॅमसनने या महत्त्वाच्या सामन्यात पाचव्या क्रमांकावर येण्याऐवजी चौथ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवं होतं. त्याला सुरुवातीपासून मोठे फटके खेळता आले असते” असं गावस्कर म्हणाले.
“जर तुम्ही चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार असाल, तर चौथ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवं होतं. इतक्या महत्त्वाच्या मोठ्या सामन्यात जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. आता बघा काय झालं?” असं गावस्कर ऑन एअर कॉमेंट्री करताना म्हणाले. जोस बटलर या सामन्यात स्वस्तात बाद झाला. आर.अश्विनने या सामन्यात आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं. पण त्याच्या फलंदाजीत टी 20 सामन्याची गती दिसली नाही. सामन्यानंतर बोलताना संजू सॅमसनने 15 धावा कमी पडल्याचं सांगितलं.