मुंबई: टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर भारतासाठी क्रिकेट खेळायचे, त्यावेळी त्यांनी फार ब्रेक घेतला नाही. ते सातत्याने भारताकडून क्रिकेट खेळले. आता तसाच सल्ला त्यांनी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला दिला आहे. 2023 वर्ल्ड कपपर्यंत सिनियर खेळाडूंना विश्रांती देऊ नये, असं गावस्करांनी म्हटलं आहे.
कोण ब्रेकवर आहे?
भारतीय टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुलसह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. सिनियर खेळाडू ब्रेक घेतात, त्यामुळे बेंचवर बसलेल्या खेळाडूंना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळते.
गावस्करांच म्हणणं काय?
सततचे बदल, अनिश्चितता यामुळे टीमच्या उद्देशाला धक्का पोहोचू शकतो, असं गावस्कर म्हणाले. 2023 वनडे वर्ल्ड कप खेळणाऱ्या फलंदाजांसाठी एक चांगला सुनियोजित प्लान असावा, असं गावस्करांच मत आहे.
का एकत्र खेळलं पाहिजे?
“फलंदाजी कमी-जास्त झाल्याने फरक पडत नाही. पण वर्षभरापेक्षा कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे आता विश्रांतीचा कालावधी असू नये. परस्परात समन्वय, संतुलन साधण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त एकत्र खेळलं पाहिजे” असं गावस्कर म्हणाले.
“मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये चांगल्या भागीदाऱ्या होण्यासाठी फलंदाजांमध्ये आत्मविश्वास पाहिजे तसंच परस्पराच्या खेळाचा अंदाज असला पाहिजे. नियमितपणे ते एकत्र खेळतील, तेव्हाच हे घडू शकतं” असं सुनील गावस्कर म्हणाले.
विश्रांती देण्यामागचा उद्देश काय?
सध्या सुरु असलेल्या न्यूझीलंड टूरमध्ये सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. खेळाडूंना ताजतवान ठेवणं, हा त्यामागचा उद्देश आहे. फक्त खेळाडूच नाही, कोचिगं स्टाफमध्ये सुद्धा बदल होतायत. माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी राहुल द्रविड यांच्यावर ब्रेक घेण्यावरुन निशाणा साधला आहे. “माझा ब्रेकवर विश्वास नाही. मला माझ्या टीमला आणि खेळाडूंना समजून घ्यायचं आहे. त्यानंतर टीमवर नियंत्रण मिळवायचय. तुम्हाला इतके ब्रेक का हवे?” असा प्रश्न रवी शास्त्री यांनी विचारला होता.