मुंबई: सध्या मुंबईच्या आणि भारतीय क्रिकेट वर्तुळात पृथ्वी शॉ च्या नावाची चर्चा सुरु आहे. या चर्चेला कारण ठरलाय पृथ्वीचा परफॉर्मन्स. पृथ्वी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने ट्रिपल सेंच्युरी ठोकली आहे. आसाम विरुद्धच्या रणजी सामन्यात पृथ्वीने 379 धावा फटकावल्या. देशातील दिग्गज क्रिकेटपटू आता पृथ्वीच्या कामगिरीवर व्यक्त होत आहेत. फक्त आता सिलेक्शन कमिटी न्यूझीलंड विरुद्धच्या सीरीजसाठी पृथ्वीच्या कामगिरीची दखल घेते का? त्याची उत्सुक्ता आहे. पृथ्वीने त्याची दखल घ्यायला भाग पडेल, असा परफॉर्मन्स केलाय.
सेंच्युरी ठोकून टेस्ट डेब्यु, पण….
पृथ्वीने सेंच्युरी ठोकून टेस्ट डेब्यु केला होता. मुंबईतल्या शालेय स्तरावरच्या क्रिकेटपासून त्याच्या नावाची चर्चा आहे. पण असं असूनही पृथ्वी अजून टीम इंडियात स्वत:च भक्कम स्थान निर्माण करु शकलेला नाही.
पृथ्वीमुळे मुंबईच्या धावांचा डोंगर
रणजी सामना टेस्ट फॉर्मेटमधला असला, तरी पृथ्वीने वनडे स्टाइल बॅटिंग केली. त्याने 383 चेंडूत 379 धावा फटकावल्या. त्याच्या फलंदाजीमुळे मुंबईला पहिल्या डावात 138.4 ओव्हर्समध्ये 687/4 धावांचा डोंगर उभारता आला.
गावस्करांच सिलेक्शन कमिटीबद्दल विधान
भारत-श्रीलंकावनडे सामन्यादरम्यान सुनील गावस्कर यांनी पृथ्वी शॉ च्या ट्रिपल सेंच्युरीचा उल्लेख केला. मुंबईकर बॅट्समनने सिलेक्शन कमिटीच लक्ष वेधून घेतल्याचं ते म्हणाले. “पृथ्वीकडून अशाच कामगिरीची अपेक्षा होती. तो 60-70 धावा करत होता. अनेक जण 60-70 रन्स करतात. जर तुम्हाला सिलेक्शन कमिटीच लक्ष वेधून घ्यायच असेल, तर शतकी खेळी करावी लागते. डबल-ट्रिपल सेंच्युरी झळकवावी लागते. तो 400 धावांच्या जवळपास पोहोचला होता. त्याने 400 पेक्षा जास्त धावा केल्या असत्या, तर ते खूपच उत्तम ठरलं असतं” असं गावस्कर दुसऱ्या वनडे दरम्यान कॉमेंट्री करताना म्हणाले.
जय शाह यांनी सुद्धा केलं कौतुक
वर्ल्ड कपच्या वर्षात ट्रिपल सेंच्युरी झळकवणाऱ्या पृथ्वी शॉ चं भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शाह यांनी सुद्धा कौतुक केलं. “डाव घोषित करण्याचा निर्णय घेण्याआधी त्याने मुंबईला विचार करायला भाग पाडलं. रणजीमध्ये 443 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. पृथ्वी त्या धावसंख्येच्या जवळ होता” असं गावस्कर म्हणाले. पृथ्वी शॉ टीम इंडियाकडून 5 टेस्ट, 6 ODI आणि एक टी 20 सामना खेळलाय.