नवी दिल्ली : पंजाब किंग्सने मोहालीत धावांचा डोंगर उभारला. हा डोंगर पोखरणं मुंबई इंडियन्सला शक्यच होणार नाही असं वाटत होतं. पण इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांची बॅट तळपली. या दोघांनी मोहालीत माहौल तयार केला अन् मुंबईला विजय मिळवून दिला. दोघांनीहा चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. या दोघांनीही क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. सूर्यकुमार यादव आणि इशान दोघेही आपल्या पूर्वीच्याच लयीत दिसले. दोघांनाही सूर गवसला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने इन्स्टावर पोस्ट टाकून या दोन्ही खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांचं भरभरून कौतुक केलं.
मोहालीत काल मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना पार पडला. यावेळी मुंबईने पंजाबला सहा विकेटने पराभूत केले. या आधी वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघानी धावांचा पाऊस पाडला होता. तेव्हा पंजाबने मुंबईला पराभूत केलं होतं. त्याचं उट्टं काल मुंबईने काढलं. काल पंजाबने 214 धावा केल्या. मुंबईच्या फलंदाजांनीही स्फोटक फलंदाजी करत 18.5 ओव्हमध्येच विजय मिळविला. या विजयात सूर्यकुमार यादव यांचा वाटा मोठा होता.
गेल्या काही दिवसांपासून सूर्यकुमार यादव याचा परफॉर्मन्स काही चांगला चालला नव्हता. त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. त्यामुळे तो चांगलाच परेशान झाला होता. मुंबई इंडियन्सलाही चिंता लागून राहिली होती. मागच्या सामन्यात सूर्यकुमारने 57 धावांची खेळी खेळली होती. पण संघाला विजय मिळवून देता आला नाही. पण यावेळी असं झालं नाही. मात्र कालच्या सामन्यात सूर्यकुमार यादव तळपला. इशानसारख्या स्फोटक फलंदाजाची साथ मिळाल्यानंतर सूर्यकुमारनेही आपला नैसर्गिक खेळ दाखवला.
सात षटकं टाकून झाली होती, तेव्हा सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी आला. तेव्हा मुंबईला 14 षटकांमध्ये 161 धावांची गरज होती. सूर्यकुमारने मैदानावर येताच आपला जलवा दाखवण्यास सुरुवात केली. सूर्याची बॅट तळपत होती. 13व्या ओव्हरमध्ये सूर्यकुमारने दोन षटकार आणि दोन चौकार लगावले. त्याने अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं. 16व्या ओव्हरमध्ये तो आऊट झाला. पण तोपर्यंत त्याने 31 चेंडूत 8 चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने 66 धावा केल्या होत्या. यावेळी इशान किशन आणि सूर्यकुमारने 55 चेंडूत 116 धावांची भागिदारी केली होती.
एवढी दमदार खेळी खेळल्यानंतरही सूर्यकुमार खूश नाहीये. आपण खेळ संपवू शकलो नाही. मध्येच आऊट झालो, याची सल त्याच्या मनात आहे. मागच्या सामन्यातही त्याला संपूर्ण मॅच खेळता आली नव्हती. मात्र, तरीही दोन्ही सामन्यातील त्याची कामगिरी चांगली होती. सीजनच्या सुरुवातीच्या पाच सामन्यात त्याला एकही अर्धशतक करता आलं नव्हतं. मात्र, गेल्या चार सामन्यात त्याला अर्धशतकी खेळी करता आली आहे.