मुंबई: टीम इंडियात सूर्यकुमार यादवच प्रमोशन झालय. श्रीलंकेविरुद्धच्या T20 सीरीजसाठी त्याला उपकर्णधार बनवण्यात आलय. उपकर्णधारपदी निवड आणि दुसऱ्यादिवशी शतक हे घडलं असतं, तर सूर्यकुमारचा आनंद द्विगुणित झाला असता. पण हा योग जुळून आला नाही. रणजी ट्रॉफी स्पर्धेत सूर्यकुमारची शतकाची संधी पुन्हा एकदा हुकली. सूर्युकमार यादव मुंबईकडून खेळतो. अवघ्या 5 धावांनी त्याचं 15 व फर्स्ट क्लास शतक हुकलं. SKY च 8 दिवसात दुसऱ्यांदा मन मोडलं.
8 दिवसांपूर्वी किती रन्सवर आऊट झाला?
याआधी सूर्यकुमार यादवची हैदराबाद विरुद्ध शतकाची संधी हुकली होती. 20 डिसेंबरला हा सामना झाला होता. त्यावेळी सूर्या 90 रन्सच्या स्कोरवर आऊट झाला होता. आज सौराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव 95 रन्सवर आऊट झाला. 8 दिवसात दुसऱ्यांदा त्याची शतकाची संधी हुकली.
शतक हुकलं पण मुंबईला सावरलं
सौराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवची शतकाची संधी हुकली. पण त्याने मुंबईला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. फक्त 6 धावात 2 विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव क्रीजवर उतरला होता. सूर्या बाद झाला, त्यावेळी मुंबईची धावसंख्या 4 विकेटवर 159 होती.
किती चौकार-षटकार मारले?
सूर्यकुमार यादवने रणजी सामन्यात वनडे स्टाइल फलंदाजी केली. त्याने 107 चेंडूत 95 धावा केल्या. यात 14 चौकार आणि एक षटकार आहे. सूर्याने त्याच्या इनिंगमध्ये 27 सिंगल, 3 वेळा 2 धावा पळून काढल्या. फर्स्ट क्लास करिअरमधील हे त्याचं 28 व अर्धशतक होतं.