टी20 वर्ल्डकप फायनलपूर्वी रोहित शर्माने खेळाडूंना दिला होता असा कानमंत्र, सूर्यकुमार यादवने केला खुलासा

| Updated on: Jul 02, 2024 | 5:37 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद मिळवण्यात टीम इंडियाला यश आलं आहे. पण या सामन्यापूर्वी रोहित शर्माने खेळाडूंना पॉवरफूल कानमंत्र दिला होता. यातून रोहित शर्माने प्रत्येक खेळाडूला सर्वस्वी देण्याचं आव्हान केलं होतं. रोहित शर्माच्या या स्पीचबाबत सूर्यकुमार यादवने खुलासा केला आहे.

टी20 वर्ल्डकप फायनलपूर्वी रोहित शर्माने खेळाडूंना दिला होता असा कानमंत्र, सूर्यकुमार यादवने केला खुलासा
Image Credit source: BCCI
Follow us on

महेंद्रसिंह धोनीनंतर टी20 वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरणारा रोहित शर्मा हा दुसरा कर्णधार ठरला आहे. मागच्या वर्षी दोन आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं होतं. मात्र या पराभवाने खचून न जाता रोहित शर्मा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पेटून उठला. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत एकही सामना न गमवता जेतेपदावर नाव कोरलं. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या दिग्गज संघांना भारताने पराभवाची धूळ चारली. रोहित शर्मा या स्पर्धेत डावपेच टाकण्यात कुठेच मागे पडला नाही. अंतिम सामन्यात अक्षर पटेलला फलंदाजीसाठी वर पाठवण्याचा निर्णय असो, की रवींद्र जडेजाला गोलंदाजीत बाजूला ठेवण्याचा निर्णय असो, रोहितच्या या निर्णयाची कायम चर्चा राहिली. आता जेतेपदावर नाव कोरल्यानंतर सूर्यकुमार यादवने रोहित शर्माबाबत खुलासा केला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्मा काय बोलला होता याबाबत सांगितलं आहे.

“या विजय शिखरावर मी एकटा जाऊ शकत नाही. मी जर शिखराचं टोक जरी गाठलं तरी मला तुमच्या सर्वांच्या ऑक्सिजनची गरज आहे. जे पण आहे. पायात.. डोक्यात.. हृदयात ते सर्वस्वी या खेळात द्या. जर हे घडलं तर आपल्याला रात्र खंत व्यक्त करण्याची वेळ येणार नाही. चला आपण सर्व कामाला लागू.”, असं सूर्यकुमार यादवने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं. रोहित शर्माचा हा कानमंत्र खेळाडूंना सामन्यात कामी आला. पाच षटकात 30 धावांची गरज असताना एकही खेळाडू डगमगला नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत टीम इंडियाने त्याच जोमाने लढत दिली आणि विजय मिळवून दिला. रोहित आपल्या गोलंदाजांच्या मागे ठामपणे उभा राहिला. त्याने गोलंदाजांचा व्यवस्थितरित्या वापर केला.

“रोहित शर्मा प्रत्येक खेळाडूच्या संपर्कात होता. मग मैदानाबाहेर असो की हॉटेल रूमध्ये किंवा समुद्रकिनारी..तो प्रत्येकाशी संवाद साधत होता. जेव्हा एकदम गंभीर परिस्थिती आली तेव्हा प्रत्येकाला माहिती होतं की रोहित शर्मा आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मला त्या माणसाबाबत एकच सांगावी लागेल. एक म्हणजे त्याचा आत्मविश्वास आणि दुसरं प्रत्येकाबाब असलेला आदर.”, असंही सूर्यकुमार यादवने पुढे सांगितलं.