मुंबई: आज प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या ओठावर सूर्यकुमार यादवच नाव आहे. सूर्यकुमार यादवचा शॉट्स खेळण्याचा अंदाज पूर्णपणे वेगळा आहे. सध्याच्या घडीला सूर्यकुमार यादवला रोखणं कुठल्याही गोलंदाजासाठी कठीण गोष्ट आहे. सूर्यकुमार यादवने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 51 चेंडूत नाबाद 111 धावा चोपल्या. भारताच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
विनायक माने कोण?
ज्या पीचवर बॅट्समनला शॉट्स खेळणं कठीण जात होतं, त्या पीचवर सूर्याने 7 सिक्स आणि 11 फोर मारले. आता प्रश्न हा आहे की, सूर्यकुमार यादव एका अवघड खेळपट्टीवर असे अजब-गजर शॉट्स इतक्या सहजतेने कसे मारु शकतो?. सूर्याला हे कसं जमतं, ते सिक्रेट त्याचा मित्र आणि माजी कॅप्टन विनायक मानेने सांगितलं.
कुठल्या क्लबने आधार दिला?
विनायक माने मुंबईसाठी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलाय. कॉर्पोरेट क्रिकेटमध्ये तो सूर्यकुमार यादव खेळायचा त्या टीमचा कॅप्टन होता. वयाच्या 18 व्या वर्षी सूर्याने बीपीसीएल टीम जॉइन केली होती. विनायक त्या टीमचा कॅप्टन होता. 2014-15 साली सूर्यकुमार यादवने वाईट दिवस अनुभवल्याच विनायकने सांगितलं. त्याला मुंबई टीमच्या कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं होतं. काही सामन्यांसाठी त्याला ड्रॉप केलं होतं. त्यावेळी त्याला मुंबईच्या पारसी जिमखाना क्लबने आधार दिला.
ते सर्व शॉट्स सूर्या कुठे शिकला?
सूर्यकुमार यादव ज्यावेळी भारतीय टीम, मुंबईसाठी खेळत नव्हता, त्यावेळी तो पारसी जिमखान्यावर यायचा. युवा खेळाडूंसोबत वेळ घालवायचा. त्यांच्यासोबत खेळायचा. सूर्यकुमार यादवने याच मैदानात आपल्या शॉट्सवर हुकूमत मिळवली. आज ज्या शॉट्सच कुठल्याही गोलंदाजाकडे उत्तर नाहीय, त्यावर सूर्याने पारसी क्लबमध्ये प्रॅक्टिस करुन हुकूमत मिळवलीय. विनायक मानेने स्पोर्ट्स स्टारला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.
जाणून घ्या सूर्याच टेक्निक
“मी सूर्याला पहिल्यापासू स्कूप शॉट्स खेळताना पाहिलय. सूर्या वयाच्या 18 व्या वर्षापासून स्कूपचा फटका खेळतोय. तो या फटक्याची भरपूर प्रॅक्टिस करायचा. त्याच्यात अलीकडेच एक मोठा बदल दिसतो, तो म्हणजे वेगवान गोलंदाजांविरोधात तो सहज स्वीप शॉट खेळतो. सूर्यकुमार शॉट्स मारताना बिलकुल ताकत लावत नाही, तो फक्त टायमिंग आणि चेंडूच्या स्पीडचा फायदा उचलतो” असू विनायक माने म्हणाला.