मुंबई: टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या बॅटिंगने धाक निर्माण केला. 3 वर्षानंतर सूर्यकुमार रणजी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. मुंबईकडून खेळणाऱ्या सूर्याने हैदराबादच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. सूर्या बऱ्याच काळानंतर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळला. सूर्याने 80 चेंडूचा सामना केला. त्याने 15 चौकार आणि एक षटकार लगावला. सूर्या जबरदस्त खेळला. पण त्याचं मन मोडलं. सूर्याने 90 धावा फटकावल्या. पण कमबॅक मॅचमध्ये त्याची शतक झळकवण्याची संधी हुकली. निराश मनाने तो पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्याने सलामीवीर यशस्वी जैस्वालसोबत मिळून 153 धावांची शानदार भागीदारी केली.
पृथ्वी शॉ ने किती धावा केल्या?
मुंबईचा संघ रणजी ट्रॉफीमधील एक यशस्वी संघ आहे. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईची सुरुवात खराब झाली. 23 रन्सवर पृथ्वी शॉ च्या रुपात पहिला विकेट गेला. खराब फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वी शॉ ला सूर सापडला नाही. तो अवघ्या 19 रन्सवर कार्तिकेयचा बळी ठरला.
त्या दोघांनी सावरला मुंबईचा डाव
सुरुवातीच्या विकेट झटपट गेल्यानंतर दुसऱ्याबाजूने यशस्वीने सूर्यकुमारच्या साथीने चांगली बॅटिंग केली. यशस्वी एकाबाजूने सावध फलंदाजी करत होता. त्याचवेळी सूर्याची त्याच्या नेहमीच्या स्टाइलमध्ये आक्रमक बॅटिंग सुरु होती. त्याने पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांची धुलाई सुरु केली. त्याचा स्ट्राइक रेट 112.50 होता. सूर्या आणि यशस्वीने भागीदारी करुन मुंबईचा डाव सावरला.
सूर्या शेवटचा रणजी सामना कधी खेळलेला?
33 व्या ओव्हरमध्ये मुंबईला दुसरा झटका बसला. शशांकच्या ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवर आक्रमक फलंदाज सूर्या LBW बाद झाला. सूर्या बऱ्याच काळानंतर रणजी ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. याआधी फेब्रुवारी 2020 मध्ये मध्य प्रदेश विरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. कसोटी मालिकेमुळे सूर्या सध्या टीम इंडियापासून दूर आहे. बांग्लादेश दौऱ्यासाठी त्याला आराम दिलाय. सूर्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. सूर्याने मागच्या महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यात चांगली फलंदाजी केली होती. न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात त्याने नाबाद 111 धावा फटकावल्या होत्या.