मुंबई: भारताने 1983 साली आजच्याच दिवशी 25 जूनला पहिल्यांदा वर्ल्ड कप (1983 World cup) जिंकला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने त्यावेळचा दिग्गज संघ वेस्ट इंडिजला (West Indies) धूळ चारली होती. वेस्ट इंडिजने त्या आधी सलग दोनदा वर्ल्ड कप जिंकला होता. भारताने त्यांची हॅट्ट्रिकची संधी हुकवली. त्यावेळी कपिल देव (Kapil dev) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल, याचा कोणीही विचार केला नव्हता. पण हे असं प्रत्यक्षात घडलं होतं. हा सांघिक विजय होता. टीम मधील प्रत्येक खेळाडूने योगदान दिलं होतं. आता सय्यद किरमाणी यांनी या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयाबद्दलच्या त्यांच्या स्वत:च्या काही व्यक्तीगत तक्रारी मांडल्या आहेत. वर्ल्ड कप विजयातील आपल्या योगदानाची म्हणावी तितकी चर्चा झाली नाही, असं सय्यर किरमाणी यांच मत असून या बद्दलची खंत त्यांच्या मनात आहे.
भारताचा पहिल्या वर्ल्ड कप विजयाचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. या स्पर्धेत कॅप्टन कपिल देव एक संस्मरणीय खेळी खेळून गेले. ज्याची आजही क्रिकेट रसिक चर्चा करतात. कपिल झिम्बाब्वे विरुद्ध ती इनिंग खेळले होते. कपिल देव यांनी अवघड परिस्थितीतून संघाला बाहेर काढलं व 175 धावा ठोकल्या होत्या. भारताने सुरुवातीला अशक्य वाटणारा हा सामना जिंकला होता. कपिल देव ही रोमांचक फलंदाजी करु शकले, कारण त्यांना दुसऱ्याबाजूने साथ मिळाली. त्या सामन्यात कपिल देव यांना ती साथ दिली होती, सय्ययद किरमाणी यांनी. “मी कपिल देवला सपोर्ट केला नसता, तर कदाचित भारत वर्ल्ड कप जिंकू शकला नसता” असं सय्यद किरमाणी म्हणाले.
“कपिलने निश्चित 175 धावा केल्या. लोक फक्त कपिलच्या त्या शानदार खेळी बद्दल बोलतात. कपिलला तो सपोर्ट कोणी केला? या बद्दल ते बोलत नाहीत. मी त्यावेळी कपिल देव बरोबर ती भागीदारी केली नसती, तर वर्ल्ड कप जिंकण्याचा विषयच सोडून द्या. आम्ही बाद फेरीसाठी सुद्धा पात्र ठरु शकलो नसतो. कुठला रिपोर्टर किंवा सोशल मीडियावर अजून कोणी हे लिहिलेलं नाही, की कपिलने जे 175 रन्स केले, त्यासाठी किरमाणीने त्याला सपोर्ट केला होता. भारताला सेमाीफायनलमध्ये पोहोचवण्यासाठी मदत केली होती” असं सय्यद किरमाणी म्हणाले.