मुंबई : ऋतुराज गायकवाडने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सलग तिसरे अर्धशतक झळकावले आहे. त्याने ओडिशाविरुद्ध 81 धावांची शानदार खेळी केली आणि आपल्या संघाला 27 धावांनी विजय मिळवून दिला. या स्पर्धेतील तिन्ही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली आहेत. त्याने तीन सामन्यांत 212 धावा कुटल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 70.67 आणि स्ट्राइक रेट 161.83 इतका होता. ऋतुराज आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. अश्विन हेबरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने तीन सामन्यांत 221 धावा फटकावल्या आहेत. त्यापाठोपाठ ऋतुराजचा नंबर लागतो. (Syed Mushtaq Ali Trophy: Ruturaj Gaikwad Slams 81 runs in 47 balls, Maharashtra Beat Odisha)
ओडिशाविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर ऋतुराजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडू आणि पंजाबनंतर त्याने ओडिशाविरुद्धही अर्धशतक झळकावले. त्याने केदार जाधवसोबत दुसऱ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली. जाधवने 35 चेंडूत 55 धावा केल्या. 15 व्या षटकात ऋतुराज बाद झाल्यानंतर महाराष्ट्राचे उर्वरित फलंदाज फारसे काही करू शकले नाहीत आणि ओडिशाला 183 धावांचे लक्ष्य मिळाले.
183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओडिशाचा संघ फार काही करू शकला नाही आणि 156 धावांवर गारद झाला. ओडिशाचा संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही. 18.5 षटकात त्यांचा संपूर्ण संघ बाद झाला. ओडिशाकडून अंशुमन रथने सर्वाधिक 34 धावा केल्या. दुसरीकडे, मुंबईचा वेगवान गोलंदाज दिव्यांग हिमगणेकरने 34 धावांत पाच बळी घेतले. त्याच्याशिवाय आशय पालकरनेही तीन बळी घेतले.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021 मध्ये ऋतुराज गायकवाड महाराष्ट्र संघाचा कर्णधार असून सलामीची जबाबदारीही सांभाळत आहे. 5 नोव्हेंबर रोजी पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने 54 चेंडूत 80 धावांची जबरदस्त खेळी केली आणि महाराष्ट्राला सात विकेटने मोठा विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाला सहा गड्यांच्या मोबदल्यात केवळ 136 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात गायकवाडच्या 80 धावांच्या खेळीमुळे महाराष्ट्राने 15 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
लखनौ येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत पंजाबच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. सलामीवीर शुभमन गिलने 39 चेंडूत 44 आणि गुरकीरत सिंग मानने 32 चेंडूत 41 धावा केल्या. त्यांच्याशिवाय उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. शेवटच्या षटकात सनवीर सिंगने 18 चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने 28 धावा करत संघाला 137 धावांपर्यंत नेले. पंजाबच्या फलंदाजांना संपूर्ण डावात केवळ पाच चौकार आणि पाच षटकार लगावता आले. महाराष्ट्रातून दिव्यांग हिमगणेकर सर्वाधिक यशस्वी ठरला. त्याने चार षटकांत 17 धावा देत दोन बळी घेतले. आशय पालकरने 2 आणि मुकेश चौधरीने एक गडी बाद केला.
इतर बातम्या
निवृत्तीच्या निर्णयानंतर ड्वेन ब्राव्होकडून चाहत्यांना खुशखबर, महेंद्रसिंह धोनीला मोठा दिलासा
T20 World Cup 2021: चॅम्पियन होण्यासाठी पाकिस्तानला आज स्कॉटलंडविरुद्धचा सामना गमवावा लागेल, पण का?
पुढील T20 World Cup च्या सुपर-12 मधील टीम कन्फर्म, BAN, AFG इन, WI, SL आऊट
(Syed Mushtaq Ali Trophy: Ruturaj Gaikwad Slams 81 runs in 47 balls, Maharashtra Beat Odisha)