मुंबई: आशिया कप (Asia Cup) स्पर्धेसाठी बीसीसीआयने काल रात्री संघाची घोषणा केली. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी निवड समिती सदस्य किरण मोरे (Kiran More) यांनी आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या संघावर आपलं मत व्यक्त केलं आहे. आशिया कप टी 20 स्पर्धेसाठी जो संघ निवडण्यात आलाय, त्यापेक्षा टी 20 वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ वेगळा असेल, असं किरण मोरे यांना वाटतं. मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा भारताच्या टी 20 वर्ल्ड कप संघाचा निश्चित भाग असेल, असा दावा किरण मोरे यांनी केला आहे.
शमी भारताच्या वर्ल्ड कप टीमचा भाग असला पाहिजे. राहुल द्रविड यांना नेहमी बॅक अप सज्ज ठेवायला आवडतं. एखाद्या गोलंदाजाला दुखापत झाल्यास, आवेश खान सारखा गोलंदाज उपयुक्त ठरु शकतो, असं किरण मोरे म्हणाले. “जसप्रीत बुमराहची दुखापत किती गंभीर आहे, त्या बद्दल मला कल्पना नाही. पण वर्ल्ड कप टीम मध्ये मोहम्मद शमीची निवड झाली पाहिजे” असं मोरे म्हणाले.
आशिया कपसाठीच्या संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. केएल राहुल आणि विराट कोहली यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेल, संजू सॅमसन यांना वगळण्यात आलं आहे. मोहम्मद शमीचा निवड समिती टी 20 साठी विचारच करत नाही. तो त्यांच्या योजनेचा भाग नाहीय. त्यामुळे शमीची अलीकडच्या टी 20 मालिकांसाठी संघात निवड करण्यात आली नव्हती.