मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला आज अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. भारत जिंकला नाही तर भारताला आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये जाणे अशक्य होईल. भारताने त्यांच्या शेवटच्या सामन्यात काही बदल केले होते जे संघासाठी उपयुक्त ठरले नाहीत. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला सल्ला देताना म्हटले आहे की, संघाने आपल्या गोलंदाजीत बदल केला नाही तर चांगले होईल. यामागचे कारण सांगताना झहीरने म्हटले आहे की, भारतीय फलंदाजांनी गोलंदाजांना त्यांचे काम करण्याची फारशी संधी दिली नाही. (T20 WC : Zaheer khan says indian batter did not give chances to bowlers to save matches)
भारताने पहिला सामना पाकिस्तानविरोधात 10 विकेटने गमावला होता. यानंतर न्यूझीलंडने त्यांचा आठ गडी राखून पराभव केला. पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना 151 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना केवळ 110 धावांवर रोखले.
क्रिकबझशी बोलताना झहीर म्हणाला की, टीम इंडियाला फक्त आपली विचारसरणी सुधारण्याची गरज आहे. झहीर म्हणाला, “मला वाटत नाही की, त्यांनी कोणतेही बदल करावेत कारण आतापर्यंत तुम्ही तुमच्या गोलंदाजांना काम करण्यासाठी काहीही दिलेले नाही. त्यांना फराशी संधीदेखील मिळाली नाही. जर भारताच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली असती आणि मग गोलंदाज अपयशी ठरले असते तर आपण त्यांच्या कामगिरीबाबत बोललो असतो. परंतु भारताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी न केल्याने सगळी गणितं बिघडली. तुम्ही दोन सामने गमावले कारण तुम्ही जास्त धावा केल्या नाहीत. त्यामुळे गोलंदाजीत कोणत्याही बदलाची आवश्यकता वाटत नाही.
न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने आपल्या फलंदाजीच्या क्रमात बदल केले होते आणि रोहित शर्माऐवजी केएल राहुलसोबत ईशान किशनला सलामीला पाठवले होते. या बदलावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. या फलंदाजीच्या क्रमाबद्दल झहीर म्हणाला, अवघ्या एका सामन्याच्या निकालानंतर तुम्ही तुमच्या फलंदाजीच्या क्रमात मोठा बदल केलात, जो चुकीचा ठरला. तुम्ही जर रोहित शर्माला पुन्हा ओपनिंगसाठी पाठवले तर तेही बरोबर आहे. घेतलेला निर्णयदेखील वाईट नव्हता, मात्र त्याचे चांगले परिणाम दिसले नाहीत.
इतर बातम्या
(T20 WC : Zaheer khan says indian batter did not give chances to bowlers to save matches)