दुबई : ICC T20 विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाने आपला जबरदस्त फॉर्म कायम राखला आहे. पाकिस्तानने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने नामिबियाचा पराभव करत उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले आहे आणि विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा पाकिस्तान पहिलाच संघ ठरला आहे. या सामन्यात पाकिस्तानने नामिबियाचा 45 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने दोन गडी गमावून 189 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी नामिबियाला निर्धारित 20 षटकात 5 बाद 144 धावांत रोखलं. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान पाकिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला. त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. (T20 world Cup 2021 : Mohammad rizwan leads pakistan to deafeat namibia by 45 run)
रिझवानला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले असले तरी या सामन्याच्या सुरुवातीला त्याच्यावर प्रेक्षकांनी तोंडसुख घेतलं होतं. त्याने डावाची सुरुवात खूपच धिम्या गतीने केली होती. त्यामुळे हा कसोटी क्रिकेट खेळतोय की काय, असं बोललं जात होतं. मात्र अखेरच्या 10 चेंडूत त्याने सामन्याचं चित्र बदलून टाकलं.
रिझवानचा खेळ दिसतो तितका सोपा नव्हता. 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत तो धावा काढण्यासाठी संघर्ष करत होता. नामिबियाच्या डावखुऱ्या गोलंदाजांसमोर त्याच्या सर्व पद्धती अपयशी ठरत होत्या. पण शेवटच्या षटकात त्याने गेम चेंज केला आणि त्याची खरी क्षमता त्याने दाखवली. पाकिस्तानच्या डावाच्या 17.5 षटकापर्यंत रिझवान 40 चेंडूत 44 धावा करुन खेळत होता. तो सलामीवीर म्हणून उतरला होता. पण पाकिस्तानचा डाव संपला तेव्हा त्यांची धावसंख्या 50 चेंडूत 79 धावा इतकी होती. म्हणजेच पुढच्या 10 चेंडूत त्याने 35 धावा फटकावल्या.
मोहम्मद रिझवानने कर्णधार बाबर आझमसह सलामी दिली. डावाचे पहिले षटक रुबेन ट्रम्पेलमनने टाकले. यामध्ये रिझवानला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि पहिले षटक मेडन झाले. मोहम्मद रिझवानने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पहिल्यांदाच ओव्हर मेडन खेळली. यानंतर पुढच्या षटकातही ट्रम्पमनने त्याला अडचणीत आणले. या गोलंदाजाचे नऊ चेंडू खेळल्यानंतर रिझवानला एक धाव करता आली. पाकिस्तानच्या डावाच्या 10 व्या षटकापर्यंत मोहम्मद रिझवानने 25 चेंडूत 16 धावा केल्या होत्या. त्यात त्याला एकच चौकार लगावता आला होता. यादरम्यान, तो अनेकदा बाद होता-होता वाचला.
या सामन्यात पाकिस्तानने नामिबियाचा 45 धावांनी पराभव केला. पण जिंकण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत झुंज दिली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने दोन गडी गमावून 189 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने नाबाद 79 धावांची खेळी केली. यानंतर बाबर आझमने 70 धावा केल्या. मोहम्मद हाफीजने नाबाद 32 धावा केल्या. नामिबियाकडून क्रेग विल्यम्सने 40 धावा केल्या. स्टीफन बियर्डने 29 धावा केल्या. डेव्हिड विझाने नाबाद 43 धावा केल्या. तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. कर्णधार गेरहार्ड इरास्मसने 15 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर सर्वांनी सांघिक कामगिरी केली. हसन अलीला ब्रेकथ्रू मिळाला. इमाद वसीमलाही एक विकेट मिळाली. हॅरिस रौफ आणि शादाब खान यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.
इतर बातम्या
(T20 world Cup 2021 : Mohammad rizwan leads pakistan to deafeat namibia by 45 run)