ब्रिस्बेन: तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानला हरवून झिम्बाब्वेच्या टीमने टी 20 वर्ल्ड कपमध्ये धक्कादायक निकालाची नोंद केली. आज बांग्लादेश विरुद्ध त्यांचा सामना झाला. झिम्बाब्वेच्या टीमने अगदी थोडक्यात हा सामना गमावला. या मॅचमध्ये अखेरचं षटक पाहतान अनेकांच्या ह्दयाचे ठोके वाढले असतील. एका रोमांचक सामन्यात बांग्लादेशने झिम्बाब्वेचा पराभव केला.
झिम्बाब्वेकडून जोरदार लढत
लास्ट ओव्हरमध्ये झिम्बाब्वेला विजयासाठी 16 धावांची गरज होती. याच ओव्हरमध्ये क्रिकेटमधील थरार अनुभवायला मिळाला. शेवटच्या ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडूमुळे सामना रोमांचक बनला. एकवेळ मैदानाबाहेर बांग्लादेशच्या विजयाचा जल्लोष सुरु झाला होता. पण मॅच तिथे संपली नाही. बांग्लादेशने ही मॅच जरुर जिंकली. पण दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेने त्यांना चांगली टक्कर दिली.
कशी होती लास्ट ओव्हर?
शेवटच्या ओव्हरमध्ये झिम्बाब्वेला विजयासाठी 16 धावांची गरज होती. बांग्लादेशचा कॅप्टन शाकिब अल हसनने मोसद्देक हुसैनच्या हाती चेंडू सोपवला. त्यावेळी रियान बर्ल स्ट्राइकवर होता.
19.1 – रियान बर्लने बॅट जोरात फिरवली. पण चेंडू बॅटला लागला नाही. चेंडू पॅडला लागून लेग बायचा एक रन्स मिळाला.
19.2 – ब्रॅड एवंस क्रीजवर होता. त्याने डीप मिडविकेटचा चेंडू मारला. अफीफ हुसैनने कॅच घेतली. झिम्बाब्वेला आता चार चेंडूत विजयासाठी 15 धावांची गरज होती.
19.3 – नगारवाने शॉर्ट थर्ड मॅनला फटका मारण्याचा प्रयत्न केला. इथे झिम्बाब्वेला लेग बायचे चार रन्स मिळाले.
19.4 – झिम्बाब्वेला एका मोठ्या फटक्याची गरज होती. नगारवाने डीप बॅकवर्डला सिक्स मारला. झिम्बाब्वेला विजयासाठी 2 चेंडूत 5 धावा हव्या होत्या.
19.5 – मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नगारवा स्टम्प आऊट झाला.
19.6- मोसद्देक हुसैनच्या शेवटच्या चेंडूवर मुजरबानीला नुरुल हुसैनने स्टम्प आऊट केलं. मॅच संपलीय असं सर्वांना वाटलं. खेळाडू मैदानाबाहेर निघाले. पण ड्रामा इथे संपला नव्हता. खेळाडू ड्रेसिंग रुमकडे चालले होते. इतक्यात अंपायरने नो बॉल दिला.
19.6- खेळाडू पुन्हा क्रीजवर आले. मुजरबानी स्ट्राइकवर होता. त्याने पुन्हा एकदा बॅट फिरवली. पण बॅटचा चेंडूला स्पर्श झाला नाही. अखेरीस बांग्लादेशची टीम 3 रन्सने जिंकली.
थोडक्यात संधी हुकली
बांग्लादेशच्या टीमने या मॅचमध्ये पहिली फलंदाजी केली. त्यांनी 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 150 धावा केल्या. झिम्बाब्वेच्या टीमने 8 विकेट गमावून 147 धावा केल्या. अवघ्या 3 रन्सनी त्यांनी हा सामना गमावला. झिम्बाब्वेकडे दुसरा धक्कादायक निकाल नोंदवायची संधी होती.