मेलबर्न: इंग्लंडच्या टीमने T20 वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवलं आहे. फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानवर 5 विकेट राखून विजय मिळवला. पाकिस्तानने इंग्लंडला विजयासाठी 138 धावांच टार्गेट दिलं होतं. जोस बटलरच्या टीमने 6 चेंडू राखून हे लक्ष्य पार केलं. इंग्लंडची टीम दुसऱ्यांदा टी 20 चॅम्पियन बनली आहे. याआधी सुद्धा इंग्लंडच्या टीमने वर्ल्ड कप जिंकलाय.
टी 20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडच्या टीमवर पैशांचा पाऊस पडलाय. विजेता संघ इंग्लंडला प्राइज मनीपोटी 16 लाख डॉलर म्हणजे (12.88) कोटी रुपये मिळाले आहेत.
उपविजेती टीम पाकिस्तानलाही बऱ्यापैकी पैसा मिळाला आहे. उपविजेत्या पाकिस्तान टीमला 8 लाख डॉलर्स (6.44) कोटी रुपये मिळालेत.
आयसीसीने टी 20 वर्ल्ड कपआधी बक्षिसाच्या रक्कमेची घोषणा केली होती. टी 20 वर्ल्ड कपसाठी 5.6 मिलियन डॉलर्स म्हणजे (45.14) कोटी रुपयाची रक्कम निश्चित करण्यात आली होती. वर्ल्ड कप खेळणाऱ्या सर्व 16 टीम्समध्ये ही रक्कम विभागण्यात येणार आहे.
टी 20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला 1.6 मिलियन डॉलर आणि उपविजेत्या टीमला 0.8 मिलियन डॉलरची रक्कम मिळाली. सेमीफायनलमध्ये हरणाऱ्या टीम्सना 4-4 लाख डॉलर देण्याची तरतूद होती.
टीम इंडियाला किती पैसा मिळाला?
सेमीफायनलचा सामना हरुनही टीम इंडियाला चांगली रक्कम मिळाली. भारतीय टीमला सेमीफायनल गाठली म्हणून 4 लाख डॉलर मिळाले. सुपर 12 राऊंडमध्ये टीम इंडियाने 5 पैकी चार सामने जिंकले. त्यासाठी त्यांना 1 लाख 60 हजार डॉलर प्राइज मनीमध्ये मिळाले. म्हणजे टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 4.51 कोटी रुपये (560000 डॉलर) रक्कम मिळाली.
टी-20 वर्ल्डकप प्राइज मनी (भारतीय रुपया मध्ये)
वर्ल्ड कप विजेता: 13 कोटी रुपये (इंग्लंड)
वर्ल्ड कप उप-विजेता: 6.44 कोटी रुपये (पाकिस्तान)
सेमीफायनलिस्ट: 3.22 कोटी रुपये (भारत, न्यूजीलंड)
सुपर-12 मध्ये प्रत्येक विजय: 32 लाख रुपये
सुपर-12 मधून बाहेर जाणाऱ्या टीमला : 56.43 लाख रुपये
पहिल्या राऊंडमध्ये विजय : 32 लाख रुपये