T20 WC: पाकिस्तान सोडावं लागलेल्या खेळाडूला टीम इंडियाने स्वीकारलं

| Updated on: Oct 25, 2022 | 6:52 PM

T20 WC: कोण आहे हा पाकिस्तानी खेळाडू? ऑस्ट्रेलियात त्याने टीम इंडियासाठी काय केलं?

T20 WC: पाकिस्तान सोडावं लागलेल्या खेळाडूला टीम इंडियाने स्वीकारलं
Pakistan palyer
Image Credit source: twitter
Follow us on

सिडनी: पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडिया आता सिडनीमध्ये दाखल झाली आहे. विराट कोहलीने मागच्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची जोरदार धुलाई केली होती. सिडनीमध्ये आज विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि केएल राहुलने फलंदाजीचा सराव केला. टीम इंडियाच्या या प्रॅक्टिस सेशनमध्ये एका पाकिस्तानी गोलंदाजाला बोलवण्यात आलं होतं.

भारताच्या नेटमध्ये पाकिस्तानी गोलंदाज

या गोलंदाजाच नाव आहे, मोहम्मद इरफान ज्यूनियर. टीमच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये या गोलंदाजाने दिग्गज भारतीय फलंदाजांना गोलंदाजी केली. मोहम्मद इरफान ज्यूनियर पाकिस्तान-ए कडून क्रिकेट खेळलाय. तीन वर्ष तो पीएसएलमध्ये सुद्धा खेळला आहे.

विराट, रोहितला सतावलं

मोहम्मद इरफान ज्यूनियर पाकिस्तान सोडून आता सिडनीमध्ये स्थायिक झालाय. तो आता ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळतो. मोहम्मद इरफान ज्यूनियरने आपल्या वेगवान गोलंदाजीने विराट, रोहित सारख्या दिग्गज फलंदाजांना चांगलच अडचणीत आणलं. दिनेश कार्तिकलाही सहजतेने त्याच्या गोलंदाजीचा सामना करता आला नाही. सर्वच भारतीय फलंदाजांनी आपल्या गोलंदाजीच कौतुक केलं, असं मोहम्मद इरफानने प्रॅक्टिस सेशननंतर सांगितलं.

विराट-रोहितकडून त्याचं कौतुक

“मी माझ्या उंचीमुळे फलंदाजांना अडचणीत आणतो. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने माझं कौतुक केलं. कुठल्याही गोलंदाजाला यापेक्षा काय हवं? रोहित शर्माने मला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या” असं मोहम्मद इरफान पीटीआयशी बोलताना म्हणाला.

दुसऱ्या नेट सेशनमध्ये मी स्टीव्ह स्मिथला हैराण केलं होतं, असं इरफान म्हणाला. “मी ऑस्ट्रेलियाच्या नेट सेशनमध्ये स्टीव्ह स्मिथला दोन वेळा आऊट केलं होतं” असं स्मिथ म्हणाला.

पाकिस्तानात इरफानकडे दुर्लक्ष

मोहम्मद इरफान ज्यूनियर पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्स, मुल्तान सुल्तान आणि क्वेटा ग्लॅडियेटर्स या टीम्सकडून खेळला आहे. पीएसएलमध्ये संधी मिळणं बंद झालं, तेव्हा तो संधीच्या शोधात ऑस्ट्रेलियात आला.

“पीएसएलमध्ये संधी मिळाली नाही, तेव्हा मी ऑस्ट्रेलियात आलो. मी बाबर आजमसोबत क्रिकेट खेळलोय. मी पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळायचं स्वप्न बघितलं होतं. पण संधी मिळाली नाही, त्यामुळे ऑस्ट्रेलियात आलो” असं मोहम्मद इरफान ज्यूनियर म्हणाला.