विजय मिळताच कंठ दाटला, राशिद खान ढसाढसा रडला, भावनांची अक्षरश: त्सुनामी, अफगाणिस्तानमध्ये आनंदाची होळी

| Updated on: Jun 25, 2024 | 5:33 PM

अफगाणिस्तान संघाचा स्टार ओपनर रहमानुल्लाह गुरबाज याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो एका ठिकाणी बसून ढसाढसा रडताना दिसत आहे. तो आपल्या अश्रूंना रोखण्याचा प्रयत्न करतो, पण तो स्वत:ला आणि त्याच्या अश्रूंना रोखू शकत नाही. त्याच्यासाठी हा विजय इतका स्पेशल आणि भावनिक करणारा ठरला आहे. फक्त तोच नाही तर संपूर्ण अफगाणिस्तानची जनता या विजयानंतर रस्त्यावर आनंद साजरा करायला उतरली आहे.

विजय मिळताच कंठ दाटला, राशिद खान ढसाढसा रडला, भावनांची अक्षरश: त्सुनामी, अफगाणिस्तानमध्ये आनंदाची होळी
राशिद खान ढसाढसा रडला, विजय मिळताच कंठ दाटला
Follow us on

आयुष्यात अशक्य असं काहीच नाही हे वास्तव अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने सिद्ध करुन दाखवलं आहे. अफगाणिस्तान संघाची कामगिरी या टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमध्ये अतिशय दमदार राहिली. विशेष म्हणजे अफगाणिस्तान संघाने ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला धूळ चारली. केवळ ऑस्ट्रेलियाचा पराभव केला नाही तर नुकतंच बांगलादेशचा पराभव करत थेट सेमीफायनलमध्ये मजल मारली. अफगाणिस्तानचा हा विजय त्यांच्या देशासाठी देखील अविस्मरणीय असा ठरला आहे. या विजयाचे क्षण अफगाणिस्तान क्रिकेटच्या इतिहासात आता सूवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहेत. अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव केला तेव्हा मैदानारील खेळाडूंना आनंद गगनात मावेनासा झाला. विजयाचा आनंद कसा साजरा करावा? हे काहींना कळेनासं झालं. यावेळी राशिद खानला अक्षरश: रडू कोसळलं. अख्ख स्टेडियम पाहत होतं. एकीकडे फटाके फुटत होते. तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या डोळ्यांमधून आनंदाश्रूंच्या धारा वाहत होत्या. हे सर्व वातावरण पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकीत झालं. देशभरातील क्रिकेट प्रेमी आणि दिग्गज आजी-माजी खेळाडूंकडून अफगाणिस्तान संघाचं कौतुक केलं जात आहे.

टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या संघाने इतिहास रचला आहे. बांग्लादेश संघाचा पराभव करत अफगाणिस्तानने टी-ट्विन्टी वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये मजल मारली आहे. या विजयानंतर अफगाणिस्तान संघाचे खेळाडू मैदानावर अतिशय भावूक झालेले बघायला मिळाले. संघाचा कर्णधार राशिद खान तर अक्षरश: ढसाढसा रडला. पण त्याच्या डोळ्यांमध्ये आलेले अश्रू हे आनंदाश्रू होते. अफगाणिस्तान संघाचे स्टेडियममध्ये मॅच पाहायला आलेले चाहते देखील आपल्या स्वत:च्या अश्रूंना रोखू शकले नाहीत. त्यांना देखील यावेळी रडू कोसळलं. अफगाणिस्तान संघासाठी या वेळी मिळालेला आनंद हा अनपेक्षित आहे. अर्थात त्यांच्या संघाने केलेल्या परफॉर्मन्सचं कौतुक होणं जास्त गरजेचं आहे. कारण त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या संघाला नाकेनऊ आणलं होतं.

स्टार ओपनर रहमानुल्लाह गुरबाजही ढसाढसा रडला

अफगाणिस्तान संघाचा स्टार ओपनर रहमानुल्लाह गुरबाज याचादेखील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो एका ठिकाणी बसून ढसाढसा रडताना दिसत आहे. तो आपल्या अश्रूंना रोखण्याचा प्रयत्न करतो, पण तो स्वत:ला आणि त्याच्या अश्रूंना रोखू शकला नाही. अफगाणिस्तान संघाने केलेल्या कामगिरीवर सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. आयसीसीने अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे भावूक झालेले व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे व्हिडीओ अल्पावधितच प्रचंड व्हायरल झाले आहेत. या विजयानंतर आता अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेमीफायनलचा सामना येत्या 27 जूनला सकाळी सहा वाजता सुरु होईल.

अफगाणिस्तानमध्ये अक्षरश: आनंदाची होळी

अफगाणिस्तानच्या विजयानंतर त्यांच्या देशात अक्षरश: भारताच्या होळी सारखा सण साजरा केला जातोय. अफागाणिस्तानच्या रस्त्यांवर मोठमोठ्या मिरवणुका निघत आहेत. या मिरवणुकींमधून संघाला सेमीफायनलच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच सेमीफायनलमध्ये गेल्याबद्दल प्रचंड आनंद व्यक्त केला जातोय. अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर विजयाचा गुलाल उधळला जातोय.