टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा कुठे आणि किती संघ होणार सहभागी, आयसीसीने केलं स्पष्ट

| Updated on: Jul 01, 2024 | 5:02 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धा संपली असून आता 730 दिवसानंतर पुन्हा एकदा स्पर्धेचा थरार रंगणार आहे. 2026 मध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत असणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण 20 संघ सहभागी होणार आहे. पण 2026 नंतरच्या पर्वात किती संघ खेळतील याबाबत मात्र आयसीसीने काहीच स्पष्ट केलेलं नाही. पण चाहत्यांची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा कुठे आणि किती संघ होणार सहभागी, आयसीसीने केलं स्पष्ट
Follow us on

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा अर्थात दहावं पर्व भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. आजपासून दोन वर्षांनी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. मात्र ही स्पर्धा नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीत होण्याची शक्यता आहे. कारण जून ते सप्टेंबर महिन्यात पावसाची दाट शक्यता असते. त्यामुळे स्पर्धेत वारंवार खंड पडू शकतो. तसेच भारतात आयपीएलचं आयोजन मार्च ते मे महिन्यात होतं. त्यामुळे हे वेळापत्रक लक्षात घेऊन स्पर्धेचं आयोजन केलं जाऊ शकतं. नुकत्याच पार पडलेल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी झाले होते. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 20 संघ खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे पुढच्या पर्वात 24 संघ सहभागी होतील अशी चर्चा रंगली आहे.

2026 फुटबॉल विश्वचषकात 48 संघ भाग घेणार आहेत. त्याचप्रमाणे 2026 च्या टी20 विश्वचषकात 24 संघ प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पुढील विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी 6 संघांचे 4 गट तयार केले जातील, असं सांगितलं जात आहे. या सर्व प्रश्नांवर आयसीसीने उत्तर दिलं आहे.आयसीसीने या प्रश्नाचं उत्तर देत पुढच्या पर्वातही 20 संघच असतील हे जाहीर केलं आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत संयुक्तिकरित्या आयोजित केली जाईल. 2028 टी20 वर्ल्डकप स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. यानंतर इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडमध्ये 2030 वर्ल्डकप स्पर्धा भरवण्याचा मानस आहे.

टी20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरलेल्या संघांना 2026 स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. यात भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि अमेरिका या संघांचा समावेश आहे. टी20 क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील तीन संघांना प्रवेश दिला जाईल. यात पाकिस्तान, न्यूझीलंड आणि आयर्लंड यांचा समावेश आहे. या सर्वांसह एकूण 12 संघांना या स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. तसेच उर्वरित 8 संघांसाठी पात्रता फेरी पार पडणार आहे. पात्र ठरलेल्या संघांना टी20 वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळेल. दरम्यान, या दोन वर्षात भारतीय संघ कात टाकणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरेल अशी शक्यता आहे. तर प्रशिक्षकपदी कोण असेल हे येत्या आठवड्यात स्पष्ट होईल.