मुंबई: श्रीलंकेने फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून आशिया कप जिंकला. श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया कप स्पर्धा जिंकली आहे. मॅचनंतर श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाकाने सांगितलेल्या काही गोष्टी चाहत्यांना फार आवडल्या. चेन्नई सुपरकिंग्सकडून आम्ही विजयी मंत्र घेतला, असं दासुन शनाकाने सांगितलं. “सीएसकेकडून मी टॉसची प्रेरणा घेतली. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा विजय डोक्यात ठेऊन आम्ही मैदानात उतरलो” असं शनाका म्हणाला.
“पहिल्या पराभवानंतर आम्ही चर्चा केली. आमच्याकडे प्रतिभा आहे, हे आम्हाला ठाऊक होतं. सर्वच खेळाडूंनी योगदान दिलं. आमच्या क्रिकेटर्सवर विश्वास ठेवा. क्रिकेटर म्हणून जीवनाचा आनंद घेतला पाहिजे” असं शनाका म्हणाला.
“दोन-तीन वर्षांपूर्वी टीम चांगलं क्रिकेट खेळत होती. पण विजय मिळत नव्हता. हा आमच्या क्रिकेटमध्ये बदल असू शकतो. हे खेळाडू पुढची पाच-सहा वर्ष क्रिकेट खेळणं सुरु ठेवतील, हे चांगले संकेत आहेत” असं शनाका म्हणाला. “वर्ल्ड कप क्वालिफायरमधूनही मदत मिळेल. कारण मुख्य स्पर्धेआधी आम्हाला खेळण्याची संधी मिळणार आहे. वास्तवात आमच्यासाठीही चांगली संधी आहे” असं श्रीलंकेच्या कॅप्टनने सांगितलं.
हीच टीम भविष्यात मोठं यश मिळवू शकते, असं शनाका म्हणाला. “भारत-पाकिस्तानचा विषय येतो, तेव्हा तो एक वेगळा खेळ असतो. आमचा क्रिकेट इतिहास चांगला आहे. त्यामुळे आमची टीम चांगली आहे, हे आम्हाला सिद्ध करण्याची गरज नाही” असं शनाका म्हणाला.