लाहोर: टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव झाला. या पराभवानंतर अपेक्षा होती, तेच घडतय. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजम माजी क्रिकेटपटुंच्या निशाण्यावर आहे. झिम्बाब्वेने काल पाकिस्तानचा लज्जास्पद पराभव केला. अवघ्या 1 रन्सने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानचा माजी प्रसिद्ध क्रिकेटपटू वसिम अक्रम बरच काही बोलून गेला. जिंकण्यासाठी गाढवाला बाप बनवाव लागलं, तरी ते केलं पाहिजे असं वसिम अक्रम म्हणाला.
आवडीच्या खेळाडूंनाच टीममध्ये स्थान दिलं का?
भारताविरुद्ध पाकिस्तानचा शेवटच्या चेंडूवर पराभव झाला होता. त्यानंतर पाकिस्तान टीमच्या कामगिरीत सुधारणा होईल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. पण असं घडलं नाही. पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर बनलाय. टुर्नामेंट सुरु होण्याआधी जे प्रश्न उपस्थित झाले होते, तेच प्रश्न पुन्हा विचारले जात आहेत. बाबर आजमने आपले मित्र, आवडीच्या खेळाडूंनाच टीममध्ये स्थान दिलं का? असा प्रश्न विचारला जातोय.
गाढवाला बाप बनवाव लागतं
पाकिस्तानी टीमची निवड झाली. त्यावेळी अनुभवी शोएब मलिकची निवड झाली नाही. त्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता टीमच्या पराभवानंतर यावर चर्चा होणं, स्वाभाविक आहे. ‘शोएबला का बाहेर ठेवलं? ते माझ्या समजण्यापलीकडे आहे’ असं वसिम अक्रम ARY चॅनलवर एका चर्चा सत्राच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाला.
मी सिलेक्टर्सना स्पष्ट सांगेन, की….
“मिडल ऑर्डर कमकुवत आहे, हे वर्षभरापासून माहित आहे. तुम्ही शोएब मलिकची निवड केली नाही. कॅप्टन म्हणून माझं लक्ष्य जिंकणं आहे. अशावेळी मला गाढवाला बाप बनवावं लागलं, तरी ते काम मी करेन. शोएब मलिक मला मिडल ऑर्डरमध्ये हवा असेल, तर तसं मी सिलेक्टर्सना सांगीन, मला माझा खेळाडू द्या, नाही तर मी कॅप्टनशिप करणार नाही” असं वसिम अक्रम म्हणाला.
The absolute utter nonsense thrown here by the legend Wasim Akram, accusing Babar Azam of selecting his ‘friends’ and doing massive PR stunt for Shoaib Malik. He is saying, Malik should have been selected because it was Australia. Somebody tell him Malik’s stats in Aus. Unreal. pic.twitter.com/2cjxTD02Zj
— Hassan Cheema (@Gotoxytop1) October 28, 2022
बाबरला हुशारी दाखवण्याचा सल्ला
“बाबर आजमने थोडा समजूतदारपणा दाखवला पाहिजे. तो गल्लीतल क्रिकेट खेळत नाहीय. बाबरला हवे असलेले खेळाडू मिळाले, पण त्याने थोडी हुशारी दाखवली पाहिजे. ही गल्लीची टीम नाही, माझा मित्र किंवा ओळखीच्याला मी खेळवेन. सगळे खेळाडू चांगले आहेत. पण मी असतो, तर सर्वात आधी शोएब मलिकला मिडल ऑर्डरमध्ये ठेवलं असतं. हे ऑस्ट्रेलिया आहे, शारजाह किंवा दुबई नाही” असं वसिम अक्रम म्हणाला.