T20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 राऊंडमध्ये पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. अफगाणिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवलं आहे. त्यामुळे सुपर-8 च्या ग्रुप ए मधील स्पर्धा अधिक रोमांचक बनली आहे. अफगाणिस्तानने पहिली बॅटिंग केली. त्यांनी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 149 धावांच लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 127 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानने सुपर-8 मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली आहे. याआधी सुपर-8 मध्ये भारताने अफगाणिस्तानला आणि ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशला पराभूत केलं होतं. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मॅच 21 धावांनी जिंकली. अफगाणिस्तानने पहिली बॅटिंग करताना 6 बाद 148 धावा केल्या होत्या.
अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियावर विजय मिळवणं सांघिक प्रयत्नांमुळे शक्य झालं. अफगाणिस्तानने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे विजयाची स्क्रिप्ट लिहिता आली. T20 क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावरील हा पहिला विजय आहे. या विजयासह अफगाणिस्तानने टुर्नामेंटमधील आपल्या अपेक्षा कायम ठेवल्या आहेत. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियासाठी पुढचा टीम इंडिया विरुद्धचा सामना ‘करो या मरो’ असेल.
अफगाणिस्तान मोठी धावसंख्या उभारणार असं वाटलेलं
अफगाणिस्तानने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांनी निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 148 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून त्यांची ओपनिंग जोडी गुरबाज आणि जादरानने पहिल्या विकेटसाठी 15.5 ओव्हर्समध्ये 118 धावांची भागीदारी केली. हातात 9 विकेट असल्यामुळे अफगाणिस्तान मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत होतं. पण पहिल्या विकेट नंतर मूमेंटम ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या बाजूला शिफ्ट झालं.
कमिन्सची लागोपाठ दुसरी हॅट्ट्रिक
ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने या मॅचमध्ये सुद्धा हॅट्ट्रिक घेतली. T20 क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध त्याने हा कारनामा केला. T20 वर्ल्ड कपमध्ये लागोपाठ हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे. 4 ओव्हरमध्ये 28 धावा देऊन 3 विकेट घेणारा कमिन्स ऑस्ट्रेलियाचा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याच्याशिवाय जंपाने 2 विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा कोणी केल्या?
ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी 149 धावांच टार्गेट होतं. त्यांच्या बॅटिंगची ताकद लक्षात घेता हे फार मोठ टार्गेट नव्हतं. पण अफगाणिस्तानच्या टीमकडे चांगले गोलंदाज आहेत. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणलं. ते लक्ष्यापासून 21 धावा दूर राहिले. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेम मॅक्सवेलने सर्वाधिक 59 धावा केल्या.