दुबई : भारतीय क्रिकेट संघ ICC T20 विश्वचषक-2021 स्पर्धेत आज म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी करो किंवा मरो सामना खेळणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कोणत्याही किंमतीत जिंकला पाहिजे. भारताने आजच्या सामन्यात विजय मिळवला तरच तो उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवू शकेल. मात्र भारत आज पराभूत झाला तर भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. भारत अंतिम-4 च्या शर्यतीतून बाहेर पडेल. (T20 World Cup: Team India practice session ahead of Afghanistan match, suryakumra yadav back in nets)
दरम्यान, या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी, टीम इंडियाने मंगळवारी वैकल्पिक सराव सत्रात भाग घेतला आणि दुबईतील आयसीसी अकादमीमध्ये भारतीय खेळाडूंनी घाम गाळला. संघाने अगोदर सराव न करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नंतर दुपारी आपल्या निर्णयावर विचार करून पुन्हा सराव केला. या सराव सत्रातून भारतासाठी चांगली बातमी येताना दिसत आहे.
फलंदाजांमध्ये विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माने घाम गाळला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या गोलंदाजांविरुद्ध या दोघांनी बराच वेळ सराव केला. भारतासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे फलंदाज सूर्यकुमार यादवनेही नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला. पाठीच्या समस्येमुळे यादव न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. तो सराव सत्रात परतला आणि जॉगिंगला सुरुवात केली. यानंतर स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच सोहम देसाई, निक बेव आणि फिजिओ नितीन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस ड्रिल केली.
फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर जवळपास सर्वच मोठ्या खेळाडूंनी नेटमध्ये घाम गाळला. यामध्ये ऋषभ पंत, केएल राहुल यांचाही सहभाग होता. गोलंदाजांमध्ये रवींद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनीही सराव केला. त्याचवेळी दीपक चाहर आणि राहुल चाहर यांनीही सराव सत्रात भाग घेतला. हार्दिक पांड्याने मात्र सराव केला नाही.
Talk about getting into the groove ? ?@imVkohli | @ImRo45 #TeamIndia #T20WorldCup #INDvAFG pic.twitter.com/utXY9tSOKE
— BCCI (@BCCI) November 3, 2021
टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत अजूनही पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानने तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पराभूत केले होते. आज त्यांना अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. भारताला अजून तीन सामने खेळायचे आहेत. भारताने तिन्ही सामने जिंकले तरी त्यांना सेमीफायनलचं तिकीट मिळणार नाही. त्यासाठी भारताला इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल कारण न्यूझीलंडनेही तिन्ही सामने जिंकले तर भारतीय संघ आपोआप बाद होईल. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवले आणि त्यानंतर भारताने त्यांचे सर्व सामने जिंकले तर भारताला सेमीफायनलचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सर्व संघ सहा गुणांवर असतील आणि त्यानंतर सर्व काही निव्वळ धावगती (नेट रनरेट) निश्चित करेल.
अफगाणिस्तानने स्कॉटलंड आणि नामिबियाला हरवून आपली स्थिती मजबूत केली आहे. या संघाने या दोन्ही संघांना मोठ्या फरकाने पराभूत केले आणि यामुळे त्यांची निव्वळ धावगती खूप मजबूत स्थितीत आहे. या संघाला 7 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी सामना करायचा आहे. जरी अफगाणिस्तान भारताकडून हरला तरी काही फरक पडणार नाही कारण त्यांच्या निव्वळ धावगतीवर याचा परिणाम होणार नाही, पण या संघाला न्यूझीलंडचा पराभव करावा लागेल. मात्र, अफगाणिस्तानने भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना पराभूत केल्यास ते थेट सेमीफायनलमध्ये पोहोचतील.
इतर बातम्या
(T20 World Cup: Team India practice session ahead of Afghanistan match, suryakumra yadav back in nets)