काबुल : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर झाली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष अफगाणिस्तानकडे लागले असताना या सर्वाचा परिणाम अफगाणिस्तान क्रिकेटवरही होणार असल्याची चर्चा मागील बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. संघाचा प्रमुख खेळाडू राशीद खाननेही इंग्लंडमधून देशातील परिस्थितीची चिंता वर्तवली होती. तसंच आगामी टी-20 विश्वचषकातही अफगाणिस्तानचा संघ खेळेल का नाही? हा प्रश्न निर्माण झाला होता. पण नुकतंच तालिबानने क्रिकेट संघामध्ये कोणत्याच प्रकारचा हस्तक्षेप करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तालिबानच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंची भेट घेत देशातील क्रिकेटला संपूर्ण पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं.
अफगाणिस्तानी वृत्तसंस्था आरियाना न्यूजच्या रिपोर्टनुसार तालिबानचा नेता अनस हक्कानी याने नुकतंच अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हश्मतुल्लाह शाहिदी आणि क्रिकेट बोर्डचे माजी अधिकारी असदुल्लाह आणि नूर अली जादरान यांची भेट घेतली. यावेळी हक्कानी यांनी 1996 ते 2001 या त्यांच्या सत्तेतच देशात क्रिकेटची सुरुवात झाली असून आमचा क्रिकेटला कायम पाठिंबा आहे असंही त्यांनी म्हटलं.
हक्कानी यांनी पुढे बोलताना सांगितले, ”तालिबान देशातील क्रिकेटपटूंच्या पाठीशी कायमच आहे. तसेच त्यांच्या अडचणींसाठी सर्व हवी ती कारवाई देखील आम्ही करणार आहे.” दरम्यान यावेळी उपस्थित क्रिकेटपटूंनी हक्कानी आणि त्यांच्या साथीदारांचे आभार मानले. तसंच तालिबान देशातील क्रिकेटला कायम असाच पाठिंबा देईल अशी आशाही व्यक्त केली.
हे ही वाचा :
तालिबानच्या अफगाणिस्तानवरील ताब्यामुळे पाकिस्तान क्रिकेटवर संकट, PCB च्या अडचणीत वाढ
(Taliban pledges support to afghanistan cricket team)