चेन्नई: भारतीय क्रिकेट टीममध्ये सहजासहजी कोणाला संधी मिळत नाही. संधी मिळाल्यानंतर आपली जागा टिकवून ठेवणं त्यापेक्षाही कठीण असतं. काही खेळाडू टीममध्ये आपलं स्थान पक्क करण्य़ात यशस्वी ठरतात. करिअरची चांगली सुरुवात झाल्यानंतर अचानक ब्रेक लागतो. खासकरुन वय वाढण्यास सुरुवात होते, तेव्हा टीममध्ये पुनरागमन करणं कठीण असतं. अशाच काही खेळाडूंपैकी एक आहे, मुरली विजय. तो काही वर्षांपूर्वी टीम इंडियाचा नियमित ओपनर होता. चार वर्षांपूर्वी मुरली विजय टीम इंडियाच्या बाहेर गेला. त्याला आता पुन्हा संधी मिळण्याची शक्यता दिसत नाहीय. त्यामुळे त्याने निवृत्तीचे संकेत दिलेत.
वाढत्या वयाच्या खेळाडूंच स्थान
तामिळनाडूकडून खेळणाऱ्या मुरली विजयने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आपलं करिअर, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची भूमिका आणि टीम इंडियात वाढत्या वयाच्या खेळाडूंच स्थान यावर आपली मत मांडली. देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या प्लेयर्सना परदेशात खेळू न देण्याच्या बीसीसीआयच्या धोरणावर त्याने सडकून टीका केली.
निवृत्तीचे संकेत
मुरली विजयने टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये आपल स्थान पक्क केलं होतं. शिखर धवनसोबत मिळून तो सलामीला यायचा. “BCCI पुन्हा संधी देईल या प्रतिक्षेत मी थकलोय. परदेशात खेळण्याची शक्यता मी शोधतोय” क्रीडा मॅगजीन स्पोर्टस्टारच्या एका कार्यक्रमात मुरली विजयने निवृत्तीचे संकेत दिले.
लोक 80 वर्षांचा व्यक्ती समजतात
मुरली विजयला आता मोठा निर्णय घ्यायचा आहे. त्यात निवृत्ती एकमेव मार्ग आहे. विजयने फक्त BCCI च नाही, तर भारतीय मॅनेजमेंट आणि सिलेक्टर्सवर आपला संताप व्यक्त केला. वाढत्या वयाच्या खेळाडूंबद्दल जे निकष लावले जातात, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “भारतात वयाची तिशी ओलांडल्यानंतर खेळाडूकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. लोक आमच्याकडे 80 वर्षांचा व्यक्ती म्हणून पाहतात” असं मुरली विजय म्हणाला. “माझ्या मते तुम्ही वयाची तिशी ओलांडल्यानंतर शिखरावर असता. मला आता असं वाटतय की, मी सर्वश्रेष्ठ फलंदाजी करु शकतो. दुर्भाग्याने मला फार संधी मिळाली नाही. मी आता परदेशात संधी शोधतोय” असं मुरली विजय म्हणाला.
भारतासाठी केल्या 4490 धावा
टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळताना मुरली विजयने 4490 धावा केल्यात. 38 वर्षांचा मुरली विजय डिसेंबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. सततच्या अपयशामुळे त्याला टीम बाहेर करण्यात आलं. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्येही त्याला संधी मिळाली नाही.