टीम इंडियाचे नवनियुक्त हेड कोच गौतम गंभीर यांनी अलीकडेच रोहित शर्मा आणि विराट कोहली बद्दल सकारात्मक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांचे चाहते खुश झाले होते. रोहित आणि विराटला हवं असेल तो पर्यंत ते वनडे क्रिकेट खेळू शकतात, असं गौतम गंभीर म्हणाले होते. दोघेही फिट राहिले, तर ते वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये खेळताना दिसतील असं गंभीर म्हणाले होते. गौतम गंभीरच्या या वक्तव्याशी भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत अजिबात सहमत नाहीयत. श्रीकांतने एका यूट्यूब लाइवमध्ये रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं. रोहितने 2027 चा वर्ल्ड कप खेळू नये, असं श्रीकांत म्हणाले.
श्रीकांत यांनी त्यांचा मुलगा अनिरुद्ध बरोबर चर्चा करताना रोहित शर्मावर हल्लाबोल केला. “विराट कोहली एक चॅम्पियन खेळाडू आहे, रोहित शर्माने 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळू नये. दक्षिण आफ्रिकेत तो बेशुद्ध पडेल” श्रीकांत यांनी असं धक्कादायक वक्तव्य रोहित बद्दल केलं. श्रीकांत यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालय. रोहितचे फॅन्स श्रीकांत यांना ट्रोल करतायत. श्रीकांत यांनी रोहित शर्मावर निशाणा साधण्याची ही पहिली वेळ नाहीय. आयपीएल 2024 मध्येही श्रीकांत यांनी रोहितवर टीका केलेली. रोहित शर्माने नाव बदलून नो हिट शर्मा ठेवावं, असं श्रीकांत म्हणाले होते.
रोहित शर्माच्या विरोधात बोलत असतात
त्यावेळी रोहित शर्मा खराब फॉर्ममध्ये होता, म्हणून श्रीकांत यांनी अशी टीका केलेली. रोहित शर्माने T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये जबरदस्त प्रदर्शन करुन सर्वांची तोंड बंद केली. 2011 मध्ये टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप जिंकला, त्यावेळी श्रीकांतच टीमचे चीफ सिलेक्टर होते. श्रीकांत यांनी रोहित शर्माची वनडे वर्ल्ड कपसाठी टीममध्ये निवड केली नव्हती. त्याच्याजागी युसूफ पठाणला संधी मिळालेली. श्रीकांत सतत रोहित शर्माच्या विरोधात बोलत असतात. महत्त्वाच म्हणजे, रोहित आपल्या परफॉर्मन्सने त्यांना चुकीच सिद्ध करतो.