मुंबई: ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 आणि वनडे सीरीज खेळणार आहे. टी 20 सीरीजची सुरुवात बुधवारपासून होणार आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबरपासून तीन वनडे सामन्यांची सीरीजही खेळली जाणार आहे. वनडे सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार आहे. या टीममध्ये संजू सॅमसनची एंट्री पक्की मानली जात आहे.
कॅप्टनशिपसाठी दोघांमध्ये स्पर्धा
पीटीआयच्या वृत्तानुसार, शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांची निवड निश्चित आहे. मध्य प्रदेश आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा फलंदाज रजत पाटीदारलाही वनडे टीममध्ये स्थान मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनेड मालिकेत कॅप्टनशिपसाठी शिखर धवन आणि संजू सॅमसनच्या नावाची चर्चा आहे.
शिखर धवनकडे मोठा अनुभव आहे. त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सीरीजमध्येही नेतृत्व केलं होतं. संजू सॅमसन सध्या इंडिया ए च्या वनडे टीमच नेतृत्व करतोय. त्याच्याकडे आयपीएलमधल्या राजस्थान रॉयल्सच्या कॅप्टनशिपचा अनुभव आहे.
रजत पाटीदार जोरदार फॉर्ममध्ये
रजत पाटीदार मागच्या काही महिन्यापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याने शानदार प्रदर्शन केलं होतं. त्याने 8 मॅचमध्ये 55 पेक्षा जास्त सरासरीने 333 धावा ठोकल्या होत्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकं आहेत.
न्यूजीलंड-ए विरुद्ध झळकावली 2 शतकं
रजत पाटीदारने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये शतक ठोकलं. मध्य प्रदेशला चॅम्पियन बनवण्यात त्याचा महत्त्वाचा रोल होता. अलीकडेच न्यूझीलंड ए विरुद्ध अनौपचारिक टेस्ट मॅचेसमध्ये त्याने दोन शतकं झळकावली. रजत पाटीदारला मिडल ऑर्डरमध्ये स्थान मिळू शकतं.
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज खेळल्यानंतर टी 20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. श्रेयस अय्यर सुद्धा स्टँडबाय खेळाडू म्हणून टीमसोबत जाणार आहे. अशावेळी रजत पाटीदाराला टीममध्ये स्थान मिळू शकतं.