मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गमावल्यापासून टीम इंडियावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. सातत्याने टीम इंडियावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. अनेक दिग्गजांनी टीम इंडिय़ा आणि BCCI ला फटकारलं आहे. या पराभवानंतर टीम इंडियामध्ये बदलाची चर्चा सुरु आहे. एक्सपर्ट्स भविष्यातील टीम बांधणीवर बोलतायत. पण या दरम्यान टीम इंडियाचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.
दिलीप वेंगसरकर एका मुलाखीतत म्हणाले की, “बीसीसीआयने पैसा कमावला, पण बेंच स्ट्रेंथ नाही बनवू शकले” ‘ते भविष्याचा कॅप्टन बनवू शकले नाहीत’ अशा शब्दात बीसीसीआयला सुनावलं.
दिलीप वेंगसरकरांचा मुद्दा काय?
दिलीप वेंगसरकरांनी सिलेक्टर्स आणि बीसीसीआय़वर टीकेचे आसूड ओढले. “मागच्या 6-7 वर्षात निवडकर्त्यांनी भविष्यातील टीम बांधणीसाठी काही केलं नाही” असं वेंगसरकर हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
‘हीच उपलब्धता असू शकत नाही’
“निवडकर्त्यांकडे मागच्या 6-7 वर्षात कुठलीही दूरदुष्टी नव्हती. खेळाचा खोलवर अभ्यासही नव्हता. मोठे खेळाडू आराम करत असताना त्यांनी शिखर धवनला कॅप्टन बनवलं. तिथे भविष्याच्या दृष्टीने कॅप्टन निवडण्याची संधी होती” असं दिलीप वेंगसरकर म्हणाले. “टीम मॅनेजमेंटने कोणालाही तयार केलं नाही. तुम्ही सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असल्याच म्हणता, पण बेंच स्ट्रेंथ कुठेय? फक्त आयपीएल आयोजित करुन कोट्यवधी रुपये, मीडिया राइटस मिळवण हीच उपलब्धता असू शकत नाही” अशा शब्दात वेंगसरकरांनी फटकारलं.
दिलीप वेंगसरकर बोलले ते वास्तव
दिलीप वेंगसरकरांचा मुद्दा बरोबर आहे. रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण असेल? या प्रश्नाच उत्तर अजूनही मिळू शकलेलं नाही. T20 आणि वनडेमध्ये हार्दिक पांड्या त्याची जागा घेऊ शकतो. पण टेस्टमध्ये कोणावर जबाबदारी सोपवणार?. वेस्ट इंडिज नंतर या प्रश्नाच उत्तर मिळेल. पण सध्याच्या घडीला टीम इंडियाकडे फार पर्याय नाहीयत.