नवी दिल्ली : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय क्रिकेट टीमने अपेक्षेनुसार, उत्तम प्रदर्शन केलय. सीरीजचे पहिले दोन कसोटी सामने जिंकून टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय टीमसमोर ऑस्ट्रेलियाने सहज शरणागती पत्करली. इतकी दमदार कामगिरी करुनही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळाडूंच्या निवडीवरुन प्रश्नचिन्ह कायम आहे. ओपनर केएल राहुलच्या निवडीवरुन सातत्याने प्रश्न उपस्थित केला जातोय. फक्त फॅन्सच नाही माजी भारतीय क्रिकेटपटूही यावरुन सोशल मीडियावर आपसात भिडलेत. या सगळ्यामध्ये टीम इंडियाचा माजी ओपनर गौतम गंभीरने केएल राहुलचा बचाव केलाय. टॅलेंटेड खेळाडूंना सपोर्ट केला पाहिजे असं गंभीरने म्हटलंय.
इतरांवर गंभीर तुटून पडतो
खरंतर गौतम गंभीरची ही भूमिका आश्चर्यकारक आहे. कारण विराट कोहलीपासून टीम इंडियातील अन्य खेळाडूंबद्दल बोलताना गौतम गंभीरची जीभ अजिबात कचरत नाही. खेळाडूंचा परफॉर्मन्स, त्यांच संघातील स्थान यावर तो तुटून पडतो. पण तेच केएल राहुलच्या बाबतीत मात्र त्याचे सूर वेगळे आहेत. त्याचं अनेकांना आश्चर्य वाटतय. खरंतर केएल राहुल आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन आहे. गौतम गंभीर याच लखनौ टीमचा मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक आहे. याचमुळे गौतम गंभीर केएल राहुलचा बचाव करत नाहीय ना, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण होतोय.
दोघांमध्ये वाद
नागपूर पाठोपाठ दिल्ली कसोटीतही केएल राहुल अपयशी ठरला. या सीरीजमध्ये 3 इनिंगमध्ये त्याने आतापर्यंत 38 धावा केल्या आहेत. अशावेळी त्याच्या प्रदर्शनावरुन प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे. केएल राहुलच्या निवडीवरुन भारताचा माजी वेगवान गोलंदा वेंकटेश प्रसाद आणि माजी ओपनर आकाश चोपडा यांच्यात वाद सुरु आहे.
खेळाडूला टार्गेट करु नये
माजी ओपनर गौतम गंभीरला केएल राहुलच्या टीममधील स्थानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर केएल राहुलला टीममधून ड्रॉप करु नये असं तो म्हणाला. तो पीटीआयशी बोलत होता. “केएल राहुलला टीम बाहेर करु नये. कुठल्या एका खेळाडूला टार्गेट करु नये. सर्वच खेळाडूंना बॅड पॅचमधून जावं लागतं. तो खराब फॉर्ममध्ये आहे, म्हणून त्याला टीम बाहेर करा, असं कोणी म्हणू नये” असं गंभीर म्हणाला.
राहुल सुद्धा असं करु शकतो
“टॅलेंटेड खेळाडूंच तुम्ही समर्थन केलं पाहिजे. रोहित शर्माला पहा. तो सुद्धा खराब फॉर्ममध्ये होता. रोहितला उशिराने यश मिळालं. त्याच्या आधीच्या प्रदर्शनाची तुलना आताच्या प्रदर्शनाबरोबर करा. सगळ्यांनी त्याच्या प्रतिभेच समर्थन केलं. आता तुम्ही रिझल्ट पाहू शकता. तो शानदार कामगिरी करतोय. राहुल सुद्धा असं करु शकतो” असं गौतम गंभीर म्हणाला.