मुंबई : ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये विजय मिळेल, अशी टीम इंडियाला अपेक्षा होती. आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपणार असं वाटत होतं. पण टीम इंडिया फेल झाली. पण अजूनही एक संधी आहे. मोठी टुर्नामेंट बाकी आहे. टीम इंडियाला आय़सीसी ट्रॉफी जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. या टुर्नामेंटपासून देशाला खूप अपेक्षा आहेत. यंदा आयसीसीची वनडे वर्ल्ड कप स्पर्धा भारतात होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वर्ल्ड कप होईल.
वर्ल्ड कप भारतात होतोय. त्यामुळे टीम इंडिया हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आपली पूर्ण ताकत पणाला लावेल. या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे फक्त 12 सामने आहेत.
टीम इंडियाकडे वेळ कमी
टीम इंडियाने शेवटची ICC ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती. त्यानंतर जेतेपदाचा दुष्काळ कायम आहे. भारताने शेवटचा वनडे वर्ल्ड कप आपल्या घरात 2011 मध्ये जिंकला होता. टीम इंडियाकडे आता पुन्हा एकदा मायदेशात चॅम्पियन बनण्याची संधी आहे. टीम इंडियाकडे वेळ कमी आहे आणि त्यांना अनेक प्रश्नांची उत्तर शोधायची आहेत.
फक्त 12 सामने
वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे फक्त 12 सामने आहेत. भारताला वर्ल्ड कपआधी 12 वनडे सामने खेळायचे आहेत. विश्वविजेते बनण्याची तयारी करण्यासाठी त्यांच्याकडे इतकेच सामने आहेत. टीम इंडिया पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौ ऱ्यात टीम इंडिया तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळणार आहे. टीम इंडिया 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान आशिया कप खेळणार आहे. आशिया कप यावेळी वनडे फॉर्मेटमध्ये होईल. भारत आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचला, तर त्यांना सहा सामने खेळावे लागतील.
आशिया कपचा फॉर्मेट कसा?
टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्ये दोन सामने खेळावे लागतील. त्यानंतर भारत सुपर 4 मध्ये गेल्यास तीन टीम्ससोबत तीन मॅच खेळणार. फायनलमध्ये प्रवेश केल्यास आणखी एक मॅच. एकूण सहा सामने होतात. सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियन टीम भारतात येईल. या सीरीजमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळेल. त्यानंतर भारताला वर्ल्ड कप खेळायचा आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापासून ऑस्ट्रेलिया सारीजपर्यंत भारताकडे एकूण 12 वनडे सामने खेळण्याची संधी आहे.
गुण-दोषांवर काम करण्याची संधी
टीम इंडियाला या 12 सामन्यातच आपल्या गुण-दोषांवर काम करण्याची संधी आहे. भारताला या 12 मॅचमधून आपलं टीम कॉम्बिनेशन बनवाव लागेल. कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांना मधल्याफळीवर काम करावं लागेल. श्रेयस अय्यर मीडल ऑर्डरमध्ये खेळतो. सध्या त्याला दुखापत झालीय. आशिया कपपर्यंत तो फिट होईल, अशी अपेक्षा आहे.