Mohammed Shami Life Story | “जर मला माझ्या कुटुंबाची साथ मिळाली नसती, तर मी क्रिकेट सोडून दिलं असतं. 3 वेळा आत्महत्येचा विचार माझ्या मनात आला होता. माझ घर 24 व्या मजल्यावर होतं. मी अपार्टमेंटमधून खाली उडी तर मारणार नाही ना, असं माझ्या कुटुंबाला वाटायच” हे शब्द आहेत, टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीचे. आयुष्यात सर्वात कठीण काळ सुरु होता, त्या बद्दल मोहम्मद शमी बोललाय. पण वेळेबरोबर अडचणी कमी झाल्या आणि मोहम्मद शमीने एक नवा इतिहास रचला. आज सगळ्या क्रिकेट विश्वाने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची ताकत मान्य केलीय. बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध वनडे वर्ल्ड कप 2023 मधला सेमीफायनल सामना झाला. या मॅचमध्ये शमीने 7 विकेट काढून भारताला शानदार विजय मिळवून दिला. वनडे क्रिकेटमध्ये त्याने चौथ्यांदा पाच विकेट काढले. त्याशिवाय आणखी एक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. वर्ल्ड कपमध्ये 50 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज बनलाय. इथपर्यंत पोहोचण्याचा शमीचा प्रवास बिलकुल सोपा नव्हता. मागच्या काही वर्षात शमीवर बरेच आरोप झाले. वादामध्ये त्याच नाव आलं. याच काळात तीनवेळा त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येऊन गेला.
2015 वनडे वर्ल्ड कपनंतर शमी पुन्हा कमबॅकच्या प्रयत्नात होता. त्याच्या पर्सनल लाइफमध्येही बऱ्याच घटना घडलेल्या. त्याच्या नशिबात काही वेगळच लिहिलं होतं. त्याला कुटुंबाची साथ मिळाली. वाईट काळाशी संघर्ष करुन आज मोहम्मद शमी इथे पोहोचला. 2020 साली कॅप्टन रोहित शर्मासोबत एका इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये त्याने मनात सुसाइडचा विचार आल्याचा खुलासा केला. “2015 वर्ल्ड कपमध्ये मला दुखापत झाली. त्यानंतर मैदानावर पुनरागमन करण्यासाठी मला 18 महिने लागले. तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. रिहॅब किती कठीण असतं, ते तुम्हाला माहितीय. दुसऱ्याबाजूला कौटुंबिक समस्या होत्या. हे सर्व सुरु होतं. त्याचवेळी आयपीएलच्या 10-12 दिवसाआधी माझा अपघात झाला. मीडियात माझ्या खासगी आयुष्याबद्दल बरच काही चालू होतं” असं मोहम्मद शमी म्हणाला होता.
‘कुटुंबातील एक सदस्य माझ्यासोबत असायचा’
“त्या काळात मला माझ्या कुटुंबाची साथ मिळाली नसती, तर मी क्रिकेट सोडून दिलं असतं. तीनवेळा आत्महत्येचा विचार माझ्या मनात येऊन गेला. माझ्यावर नजर ठेवण्यासाठी कुटुंबातील एक सदस्य माझ्यासोबत असायचा. माझं घर 24 व्या मजल्यावर होतं. त्यामुळे त्यांना वाटायच की, अपार्टमेंटमधून उडी तर मारणार नाही ना” असं मोहम्मद शमीने सांगितलं.