रोमांचक सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवून दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. रोहितच्या टीम इंडियाने T20 मधील 17 वर्षांपासूनचा वर्ल्ड कप विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. फक्त सात महिन्यांपूर्वी 19 नोव्हेंबर 2023 रोजी 50 ओव्हरच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताच वर्ल्ड कप विजयाच स्वप्न भंग पावलं होतं. त्यावेळी कोट्यवधी भारतीयांच मन मोडलं होतं. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर मात केली होती. आता T20 वर्ल्ड कप विजयाच देशभर सेलिब्रेशन सुरु आहे.
दिल्ली, मुंबई, लखनऊ, भोपाळ, जयपूर, चंदीगड उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वत्र टीम इंडियाच्या विजयाचा फक्त जल्लोष दिसला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी मैदानावर सेलिब्रेशन केलं, तर सर्वसामान्यांनी रस्त्यावर फटाके फोडून, तिरंगा फडकवून सेलिब्रेशन केलं. आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती, टीम इंडियाच्या मायदेशी परतण्याची. मायदेशात टीम इंडियाच भव्य स्वागत होणार आहे.
भारतात परतण्याचा प्रवास कसा असेल?
टीम इंडिया आज बारबाडोसमध्येच आहे. 30 जून वर्ल्ड कपसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. सोमवारी टीम इंडिया 11 वाजता बारबाडोसवरुन न्यू यॉर्कसाठी रवाना होईल. मंगळवारी न्यू यॉर्क येथून एमिरेट्स फ्लाइटने दुबईला जाणार आहे. तिथून टीम इंडिया भारतात येईल. बुधवारपर्यंत टीम इंडिया भारतात येऊ शकते.
विजयी मिरवणूक कधी?
अजून हे ठरलेलं नाहीय की दुबईवरुन खेळाडू मुंबईला जाणार की, दिल्लीला?. याची डिटेल माहिती आज येऊ शकते. त्यानंतर टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघेल, त्याच शेड्युलड अजून आलेलं नाही. भारत चार वर्ल्ड कप जिंकणारा क्रिकेट विश्वातील तिसरा संघ बनलाय. याआधी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 7 वेळा आणि वेस्ट इंडिजने चारवेळा वर्ल्ड कप जिंकलाय.