मुंबई – टीम इंडिया सध्या न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज खेळत आहे. त्यानंतर T20 सीरीज खेळणार आहे. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या टेस्ट सीरीजवर सगळ्यांच लक्ष आहे. 9 फेब्रुवारीपासून या टेस्ट सीरीजला सुरुवात होणार आहे. या सीरीजसाठी मुंबईचा टॅलेंटेड बॅट्समन सर्फराज खानची निवड झालेली नाही. त्याची बरीच चर्चा होतेय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करुनही सर्फराजला संधी मिळालेली नाही. सर्फराज खान टीम इंडियामध्ये फिट होईल का? टीम इंडियाला त्याची कितपत आवश्यकता आहे? हे जाणून घेऊया.
पहिल्या दोन टेस्टसाठी टीम निवडली
25 वर्षांचा सर्फराज रणजी क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळतोय. लागोपाठ शतकं त्याने झळकावली आहेत. त्यामुळे एक्सपर्ट्स, फॅन्स आणि माजी क्रिकेटर्स सर्फराज खानला टीममध्ये संधी देण्याची मागणी करत आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टसाठी टीम निवडली आहे. उर्वरित दोन कसोटी सामन्यात सर्फराजला संधी देण्याचे कोणतेही संकेत निवड समितीने दिलेले नाहीत.
सर्फराजने किती धावा केल्या?
सर्फराज खानच्या देशांतर्गत क्रिकेटवरील रेकॉर्डवर एक नजर मारुया. त्याने 80 च्या सरासरीने साडेतीन हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रणजी ट्रॉफीच्या या सीजनमध्ये सर्फराज खानने आतापर्यंत 6 सामन्यात 556 धावा केल्या आहेत. 92.66 च्या सरासरीने त्याने धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीज भारतात होणार आहे. सर्फराज टीम इंडियासाठी भारतात ब्रह्मास्त्र ठरु शकतो.
सर्फराज खानला का संधी द्यावी?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये सर्फराज खानला मीडल ऑर्डरमध्ये संधी दिली जाऊ शकते. कारण विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत टीममध्ये नाहीय. कार अपघातामुळे तो बरेच महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाणार आहे. सर्फराज खान मीडल ऑर्डरमध्ये टीम इंडियासाठी भरवाशाचा फलंदाज ठरु शकतो. सर्फराज खान मुंबईसाठी मीडल ऑर्डरमध्ये खेळतो. त्याला संधी दिल्यास टीम इंडियाचा फायदा होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या दोन टेस्टसाठी टीम –
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल , कुलदीप यादव, रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबन), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.