मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर आता आगमी वेस्ट इंडिज दौऱ्याची चर्चा आहे. पुढच्या महिन्यात 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौरा सुरु होणार आहे. WTC फायनलमधील अपयश मागे सोडून टीम इंडिया आता नव्या दमाने मैदानात उतरणार आहे. वेस्ट इंडिज टूरमध्ये टीम इंडिया कसोटी, वनडे आणि टी 20 सीरीज खेळणार आहे. वेस्ट इंडिजमधील टेस्ट सीरीजपासून WTC ची नवीन सायकल सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून फायनलमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला.
टीम इंडियावर ऑस्ट्रेलियाने तब्बल 209 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियात बदल करण्याची मागणी जोरात सुरु आहे. सिलेक्शन कमिटीसुद्धा वेस्ट इंडिज सीरीजसाठी टीम निवडताना काही कठोर निर्णय घेऊ शकते.
कोणाला विश्रांती देणार?
बीसीसीआयची सिलेक्शन कमिटी रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या सीनियर खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. रोहित शर्मा आणि विराट कोहली टेस्ट सीरीजमध्ये खेळताना दिसतील. पण वनडे आणि टी 20 सीरीजसाठी त्यांना विश्रांती देण्यात येऊ शकते. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी दोघांची वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत संपूर्ण सीरीजसाठी निवड होणार नाहीय.
कुठल्या युवा प्लेयर्सची निवड होणार?
संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह या युवा खेळाडूंना वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सीरीजसाठी निवडण्यात येऊ शकतं. सॅमसन, उमरान यांचा वनडे आणि टी 20 संघात समावेश होऊ शकतो. जैस्वाल आणि अर्शदीप या दोघांची टेस्टसाठी टीममध्ये निवड होऊ शकते.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड किती तारखेला?
दोन टेस्ट मॅचनी भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा टेस्ट टीमचा कॅप्टन असेल. पण रोहितच्या सुट्टीचा कालावधी वाढला, तर कॅप्टन कोण? हा प्रश्न आहे. अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व सोपवलं जाण्याची शक्यता आहे, कारण चेतेश्वर पुजाराला डच्चू देणार अशी चर्चा आहे. वनडे आणि टी 20 सीरीजमध्ये हार्दिक पांड्या टीमच नेतृत्व करेल, अशी शक्यता आहे. बीसीसीआय टेस्टमध्ये खेळण्याबद्दल सुद्धा हार्दिक पांड्याबरोबर चर्चा करु शकते. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 27 जून रोजी टीमची निवड होऊ शकते.