Shikhar Dhawan-Ayesha Mukherjee News : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शिखर धवन इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी सीजनमध्ये पंजाब किंग्सच नेतृत्व करणार आहे. शिखर धवनला मागच्यावर्षी बांग्लादेश दौऱ्यावेळी टीम इंडियातून ड्रॉप केलं होतं. त्यामुळे धवन आगामी आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करुन टीम इंडियात पुन्हा स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. या वर्षाच्या अखेरीस वनडे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. सहाजिकच या वर्ल्ड कपमध्ये खेळायच शिखर धवनच स्वप्न असेल. शिखर धवन क्रिकेटच्या मैदानाबरोबरच त्याच्या व्यक्तीगत आयुष्यामुळेही चर्चेत आहे.
शिखर धवनचा संसार मोडला आहे. आयशा मुखर्जीपासून तो विभक्त झाला असून त्याचा घटस्फोटचा खटला कोर्टात चालू आहे. आजतक वाहिनीवरील एका कार्यक्रमात तो त्याच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दलही व्यक्त झाला.
मी फेल झालो
“मी फेल झालो. कुठलाही व्यक्ती निर्णय घेतो, त्यावेळी तो त्याचाच निर्णय असतो. मी दुसऱ्यांना जबाबदार धरणार नाही. मी फेल यासाठी झालो, कारण मला त्या फिल्डचा अंदाज नव्हता. मी क्रिकेटबद्दल आज जे बोलतोय, तुम्ही ते मला 20 वर्षांपूर्वी विचारल असतं, तर मी बोलू शकलो नसतो. ही सर्व अनुभवाची गोष्ट आहे” असं शिखर धवन म्हणाला.
लग्नपण एक मॅचच होती
“ती पण एक मॅचच होती. माझ्या घटस्फोटाचा खटला सुरु आहे. हा खटला संपल्यानंतर मला पुन्हा लग्न करायचे असेल, तर माझ्याकडे अनुभव असेल. मला कुठल्या पद्धतीचा जोडीदार हवाय. मी प्रेमात पडलो, तेव्हा रेड फ्लॅग नाही दिसले. आता प्रेमात पडलो, तर रेड फ्लॅग नक्कीच दिसतील” असं शिखर धवन म्हणाला.
लग्नाच्या फिल्डची कल्पना नव्हती
“लग्न माझ्यासाठी बाऊन्सर होता. हा चेंडू माझ्या डोक्याला लागलाय. पराभूत होण आवश्यक आहे. पण पराभवाला स्वीकारण सुद्धा शिकलं पाहिजे. माझ्याकडून चूका झाल्या, माणूस चुकांमधूनच शिकतो” असं शिखर धवन म्हणाला. लग्न मोडण्याला मीच जबाबदार आहे हे धवनने मान्य केलं. लग्नाच्यावेळी मला या फिल्डची कल्पना नव्हती, असं त्याने सांगितलं.
शिखर धवनने ऑक्टोबर 2012 मध्ये आयशा मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. 2014 साली जोरावरचा जन्म झाला. सध्या जोरावर आईसोबत मेलबर्नमध्ये आहे. धवनला आपल्या मुलाला भेटायला मेलबर्नला जात असतो.