मेलबर्न: अॅडलेड ओव्हल मैदानावर (Adelaide Oval) सुरु असलेल्या अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याचे प्रसारण करणाऱ्या ब्रॉडकास्ट क्रू मधील एका सदस्याला कोरोनाची लागण (Corona virus) झाली आहे. त्याचा कोविड-१९ चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सामना स्थळाच्या आयोजकांकडून पत्रक जारी करुन रविवारी ही माहिती देण्यात आली. संबंधित परिसर सॅनिटाईज करण्यात आला असून वेळापत्रकानुसार चौथ्या दिवसाचा खेळ सुरु राहिल, असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले. दुसऱ्या कसोटी सामन्यातील आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरु आहे.
कसोटी सामन्यादरम्यान कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी ऑस्ट्रेलियाकडून विशेष काळजी घेण्यात येत असून नियमित तपासणी केली जाते. अशाच टेस्टिंगमध्ये ब्रॉडकास्ट टीममधील सदस्याला कोविडची लागण झाल्याचे आढळून आलं. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, कोविडची लागण झालेली व्यक्ती ब्रिटिश मीडियाचा सदस्य आहे.
यापूर्वी कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला आयसोलेट व्हावे लागले. त्यामुळे मालिकेतील दुसरा कसोटी सामना त्याला खेळता आला नाही. कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिंएटमुळे सिडनी, मेलबर्न या ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहरांमध्ये कोविडची रुग्ण संख्या वाढत आहे. अॅशेस मालिकेतील पुढचे दोन सामने या शहरांमध्ये होणार आहेत. खेळाडूंनाही अतिरिक्त खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.
याआधी कोरोना ब्लास्टमुळे वेस्ट इंडिजचा पाकिस्तान दौरा स्थगित झाला आहे. वेस्ट इंडिज-पाकिस्तान टी-20 मालिके दरम्यान वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे वनडे मालिका तूर्तास रद्द करण्यात आली असून पुढच्यावर्षी दोन्ही संघांमध्ये सामने होणार आहेत.
इंग्लंड बॅकफूटवर
सध्या सुरु असलेल्या डे-नाईट कसोटीत इंग्लंड बॅकफूटवर असून यजमान ऑस्ट्रेलियाने कसोटीवर आपली पकड अधिक घट्ट केली आहे. आज सकाळच्या सत्रात प्रारंभीच ऑस्ट्रेलियाला दोन धक्के बसले आहेत. कालच्या एक बाद 45 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर नाईट वॉचमन मायकल नेसर (3) आणि सलामीवीर मार्कस हॅरिस (23) झटपट बाद झाले.
संबंधित बातम्या :
स्टीव्ह स्मिथचे बेडरुममधील चाळे पत्नीने केले उघड, मध्यरात्री एकच्या सुमारास….
BCCI अध्यक्ष सौरव गांगुलींचे विराट कोहलीबद्दल मोठे वक्तव्य, गांगुली म्हणतात…
IPL 2022: खासदार गौतम गंभीर दिसणार IPL मध्ये, लखनऊ संघाने सोपवली महत्त्वाची जबाबदारी