Virat Kohli Birthday : विराट कोहलीने वाढदिवशीच 49 वे शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी केली. यासोबतच त्याने 2023 च्या विश्वचषकातील दुसरे शतक ही झळकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट कोहली याने ईडन गार्डन्सवर 101 धावांची खेळी केली. त्याच्या वाढदिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो जगातील सातवा फलंदाज ठरला. सामन्यानंतर विराट कोहलीला क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (CAB) वाढदिवसाची खास भेट देखील दिली.
CAB चे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली यांनी रविवारी भारतीय फलंदाज विराट कोहलीला वाढदिवसानिमित्त सोन्याचा मुलामा दिलेली बॅट भेट म्हणून दिली.
CAB ने एका निवेदनात म्हटले आहे की, कोहलीला दिलेल्या बॅटवर ‘हॅप्पी बर्थडे विराट’ लिहिले होते.’तुम्ही समर्पणाचे प्रतीक आहात आणि वय हा फक्त एक आकडा आहे याचा हा जिवंत पुरावा आहे.’ या सोबतच विराटने खास त्याच्या पुतळ्याचा डार्क चॉकलेट केकच्या वर ब्लू आयसिंगसह एक मोठा केक देखील कापला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 101 धावा करून विराटने सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी केली. सचिन तेंडुलकरने देखील त्याला यासाठी शुभेच्छा दिल्या. विराट कोहलीने केवळ 277 डावात आपले 49 वे शतक पूर्ण केले. महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या 451व्या एकदिवसीय डावात 49वे शतक झळकावले.
दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकनंतर 2023 च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा खेळाडू आहे. त्याच्या 543 धावा 108.60 च्या सरासरीने आणि 88.29 च्या स्ट्राईक रेटच्या आहेत. विश्वचषकात 500 हून अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.