नवी दिल्ली : आयपीएलमध्ये सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रोमहर्षक सामना झाला. या सामन्यात बंगळूरुने 18 धावांनी विजय मिळवला. मात्र, बंगळुरूच्या विजयापेक्षा चर्चा झाली ती विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाची. या दोन्ही क्रिकेटपटूंमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यामुळे हा सामना खेळापेक्षा खेळाडूंच्या भांडणांमुळेच अधिक गाजला आहे. आता या भांडणाचं कारणही समोर आलं असून त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वादावादी झाली. या दोघांमध्ये इतकं कडाक्याचं भांडण झालं की या दोन्ही खेळाडूंचं भांडण सोडवण्यासाठी इतर खेळाडू आणि स्टाफला मध्यस्थी करावी लागली. या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लखनऊ टीमचा अमित मिश्रा आणि बंगळुरू टीमचा कर्णधार फाफ डू प्लेसिस हे दोघे सुद्धा विराट आणि गंभीरचं भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडल्याचं या व्हिडीओतून दिसून येत आहे.
गंभीरसोबत झगडा होण्यापूर्वी कोहली दोनवेळा अफगाणिस्तानी खेळाडू नवीन उल हकशीही भांडला होता. त्याचबरोबर लखनऊ टीमचा ओपनर काइल मेयर्ससोबतही त्याचं वाजलं होतं. मग मैदानाच्या बाहेर असलेल्या गंभीरशी कोहलीचं वाजलं कसं? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
पीटीआयने या वादावर प्रकाश पाडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामना संपल्यानंतर मेयर्स आणि कोहली चालताना एकमेकांशी काही तरी बोलताना दिसतात. तू मला वारंवार शिवी का देत होतास? असं मेयर्सने कोहलीला विचारलं. त्यावर तू मला ठसन देत एकटक का पाहत होतास? असा सवाल कोहलीने त्याला केला. यापूर्वी अमित मिश्रानेही अंपायरकडे कोहलीची तक्रार केली होती. दहाव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या नवीनला कोहली वारंवार शिव्या देत होता, अशी तक्रार अमितने केली होती.
Victory in Lucknow for @RCBTweets!
A remarkable bowling performance from #RCB as they bounce back in style ????
Scorecard ▶️ https://t.co/jbDXvbwuzm #TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/HBDia6KEaX
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2023
सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा कोहलीने कमेंट केली, तेव्हा गंभीरने हे संपूर्ण प्रकरण समजून घेतलं. वाद वाढण्याऐवजी गंभीर मेयर्सला बाजूला घेऊन जाऊ लागला आणि त्याला काहीही न बोलण्यास सांगायला लागला. त्यानंतर वाद झाला. पण तो बालिश होता. पण कोहली काही ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे गंभीर चिडला. आणि तुला काय बोलायचं ते बोल? असा सवालच त्याने कोहलीला केला.
त्यावर, मी तुला काही बोललोच नाही. तू का मध्ये येतोस? असं कोहली म्हणाला. त्यावर गंभीरने कोहलीला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तू खेळाडूला बोललास. म्हणजेच माझ्या कुटुंबाला तू शिवी दिली आहेस, असं गंभीर म्हणाला. त्यावर, तू तुझ्या कुटुंबाला सांभाळून ठेव, असं कोहली म्हणाला. त्यावर, आता हे तू मला शिकवणार का? अशी खोचक टीका गंभीरने केली. त्यामुळे दोघांमध्ये अधिकच वाजलं.
या वादावर आयपीएलने दोघांवर कठोर कारवाई केली आहे. आयपीएलने प्रेस रिलीज जारी केलं आहे. विराट आणि गंभीर हे दोघेही आयपीएल कोड ऑफ कंडक्ट 2.21च्या लेव्हल दोनचे दोषी आढळून आले आहेत. विशेष म्हणजे दोघांनीही आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे या दोघांचीही 100 टक्के फी कापण्यात आली आहे.