लंडन: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सने बिग बॅश लीगमधून माघार घेतलीय. त्याने अचानक माघार घेतल्याने बरीच चर्चा झाली. अचानक आलेल्या इमर्जन्सीमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याच मिल्सने सांगितलं. मिल्सच्या बीबीएलमध्ये न खेळण्याच कारण समोर आलं आहे. टायमल मिल्स डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तो आयपीएलच्या मागच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. मिल्सच्या दोन वर्षाच्या मुलीला अचानक पक्षाघाताचा झटका आला. बीबीएल लीगसाठी तो इंग्लंडवरुन ऑस्ट्रेलियाला रवाना होणार होता. त्याचवेळी अचानक त्याच्या मुलीची तब्येत बिघडली.
टायमल मिल्सने पोस्टमध्ये काय म्हटलय?
टायमल मिल्सने सोशल मीडियावर पोस्ट करुन ही माहिती दिली. त्याच्या मुलीच्या शरीराच्या एकाबाजूची हालचाल बंद झाली होती. “11 दिवसानंतर ख्रिसमससाठी घरी परतलोय. आम्ही ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी एअरपोर्टवर होतो. त्याचवेळी माझ्या मुलीला स्ट्रोक आला” असं मिल्सने सांगितलं. मिल्सची मुलगी 11 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा झालीय. पूर्णपणे बरं होण्यासाठी माझ्या मुलीला बरीच औषध घ्यावी लागतील, असं मिल्स म्हणाला.
T20 स्पेशलिस्ट गोलंदाज
टायमल मिल्स जगभरातील टी 20 लीगमध्ये खेळतो. हा डावखुरा वेगवान गोलंदाज आयपीएलमध्येही खेळलाय. 2017 मध्ये या गोलंदाजाला आरसीबीने 12 कोटी रुपये मोजून विकत घेतलं होतं. आयपीएलमध्ये मिल्सच प्रदर्शन खास नाहीय. मिल्सच नाव आयपीएल 2023 च्या ऑक्शनमध्येही आहे. त्याच्यावर कोण बोली लावतं, ते लवकरच समजेल.