डरबन: T20 क्रिकेटमध्ये मॅच कुठल्या क्षणाला फिरेल, हे कोणी सांगू शकत नाही. वेगाने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरु असताना अचानक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळतो. दक्षिण आफ्रिकेच्या बेनोनीमध्ये हे पहायला मिळालं. टीम इंडियाने स्कॉटलंडची वाट लावून 83 धावांनी विजय मिळवला. या विजयासह सुपर सिक्स राऊंडमध्ये प्रवेश केला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 149 धावा केल्या. पहिल्या दोन मॅचच्या तुलनेत ही कमी धावसंख्या होती.
टीम इंडियाकडून कोणी धावा केल्या?
भारताकडून गोंगाडी तृषाने सर्वाधिक 51 चेंडूत 57 धावा केल्या. टीम इंडियाची कॅप्टन शेफाली वर्मा स्वस्तात आऊट झाली. सीनियर टीमची मेंबर ऋचा घोषने 35 चेंडूत फक्त 33 धावा केल्या. श्वेता सहरावतने आक्रमक बॅटिंग केली नसती, तर टीम इंडिया 150 धावांच्या जवळपास पोहोचू शकली नसती. मीडल ऑर्डरमध्ये बॅटिंगसाठी आलेल्या श्वेताने फक्त 10 चेंडूत 31 धावांची धुवाधार इनिंग खेळली.
21 धावात 8 विकेट
सहा ओव्हरपर्यंत स्कॉटलंडच्या 2 विकेट गमावून 45 धावा झाल्या होत्या. मन्नत कश्यप, अर्चना देवी सिंह आणि सोनम यादवच्या स्पिन तिकडीने शानदार गोलंदाजी केली. मन्नत जबरदस्त गोलंदाजी केली. तिने 4 ओव्हर्समध्ये 12 धावा देऊन 4 विकेट काढल्या. ऑफ स्पिनर अर्ना देवीने 14 रन्स देऊन 3 विकेट काढल्या. या दोघींच्या बळावर टीम इंडियाने 21 धावात स्कॉटलंडच्या 8 विकेट काढून 66 धावात त्यांचा डाव संपवला. टीम इंडियाने सलग तिसरा विजय मिळवला. टीम इंडियाने ही मॅच 83 धावांनी जिंकली.
टीम इंडियाची दमदार सुरुवात
अंडर-19 महिला T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने दमदार सुरुवात केली. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने यजमान दक्षिण आफ्रिकेवर सहज 7 विकेटने विजय मिळवला. टीम इंडियाची कॅप्टन शेफाली वर्माने आक्रमक बॅटिंग केली. पण 18 वर्षाच्या श्वेता सहरावतने मन जिंकणारी खेळी केली. तिने 20 चौकारांच्या मदतीने धुवाधार नाबाद 92 धावा फटकावल्या. तिने 17 व्या ओव्हरमध्येच टीमला विजय मिळवून दिला.