डरबन – भारतीय महिला टीमने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये शुक्रवारी न्यूझीलंडवर मात करुन फायनलमध्ये स्थान पक्क केलं. या मॅचमध्ये पार्श्वी चोपडाने सर्वाधिक विकेट घेतल्या. पण मॅचमधील महत्त्वाचा विकेट अर्चना देवीने काढला. तिने न्यूझीलंड टीमसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या प्लिमरला आऊट केलं. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये अर्चना टीमसाठी महत्त्वाची ठरलीय. देशासाठी वर्ल्ड कपमध्ये खेळणं हे अर्चना देवीसाठी एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. उन्नावच्या एका छोट्या गावातून येणाऱ्या अर्चना देवी एका गरीब कुटुंबाशी संबंधित आहे. तिने आपल्या प्रतिभेच्या बळावर टीम इंडियात स्थान मिळवलय. देशाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी ती उत्सुक आहे.
शाळेत पाठवण्याइतपत तिच्या आईकडे पैसे नव्हते
अर्चना चार वर्षांची असताना तिच्या वडिलांच निधन झालं. वर्ष 2017 मध्ये सर्प दंशामुळे भावाचा मृत्यू झाला. त्यानंतर आईने मोठ्या कष्टाने घर चालवलं. कधी ती शेतामध्ये काम करायची, कधी घरोघर जाऊन दूध विक्री करायची. अर्चनाला शाळेत पाठवण्याइतपत तिच्या आईकडे पैसे नव्हते. ती सरकारी शाळेत शिकायची.
कुलदीप यादवच्या कोचनी अर्चनामधील प्रतिभा हेरली
याच सरकारी शाळेतील पीटी टीचर पूनम गुप्ता यांनी अर्चनामधील प्रतिभा हेरली. तिने अर्चनाच्या क्रिकेट ट्रेनिंगची जबाबदारी संभाळली. तिला कानपूरच्या क्रिकेट अकादमीत पाठवलं. कुलदीप यादवच्या कोचनी अर्चनामधील प्रतिभा हेरली. इथूनच तिच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले.
अर्चनावर फ्रेंचायजीची नजर
रविवारी आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपची फायनल होणार आहे. या मॅचसाठी अर्चना मैदानात उतरेल. टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचा तिचा प्रयत्न असेल. पुढच्या महिन्यात होणाऱ्या महिला प्रीमियर लीगच्या ऑक्शनमध्ये अर्चनावर फ्रेंचायजीची नजर असेल.