गयाना: अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत (Under 19 Cricket World Cup 2022) युगांडा विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कर्णधार यश धुल (Yash Dhull) आणि अन्य चार खेळाडूंशिवाय उतरणार आहे. ग्रुप स्टेजमधील भारताचा हा शेवटचा सामना आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या सामन्याआधी भारताचे पाच खेळाडू आरटीपीसीआर चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
बुधवारी झालेल्या आयर्लंड विरुद्धच्या सामन्याआधी या सहा खेळाडुंना आयसोलेट करण्यात आले होते. फक्त वासू वत्सची चाचणी निगेटिव्ह आली आहे, असे पीटीआयने आयसीसीच्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
भारतीय अंडर 19 संघ आधीच उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला आहे. ग्रुप बी मध्ये शेवटच्या सामन्यात ते युगांडा विरुद्ध खेळणार आहेत. शनिवारी त्रिनिदाद येथे हा सामना होईल. कर्णधार यश धुल, आराध्य यादव आणि शेख राशीद रॅपिड अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आले होते. ते आरटी-पीसीआर टेस्टमध्ये पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. मानव पाराखही पॉझिटिव्ह आला आहे. रॅपिड अँटिजेन चाचणीत त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.
“समाधानाची एकच बाब आहे, ती म्हणजे आयर्लंड विरुद्ध खेळलेले 11 जण निगेटिव्ह आले आहेत” असे आयसीसीच्या सूत्रांनी सांगितले. यश धुलमध्ये कोरोनाची गंभीर लक्षण आहेत. पण तो सुद्धा 29 जानेवारीला होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याआधी फिट होईल, अशी अपेक्षा आहे. स्पर्धेच्या नियमानुसार, बाधित खेळाडूंना पाच दिवसांच्या आयसोलेशन मध्ये रहावे लागणार आहे. या काळात तीन चाचण्यांमध्ये त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर ते पुन्हा संघासोबत जॉईन होऊ शकतात.