नवी दिल्ली: अँटिंग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर भारत आणि इंग्लंडमध्ये अंडर 19 वर्ल्डकपचा अंतिम (ICC Under 19 world cup final) सामना सुरु आहे. भारताने सुरुवातीलाच इंग्लंडला दोन धक्के दिले आहेत. इंग्लंडला अवघ्या चार धावांवर पहिला झटका बसला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमारने (Ravi kumar) सलामीवीर जेकब बेथेलला (Jacob Bethell) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याला अवघ्या दोन धावांवर पायचीत पकडलं. त्यानंतर रवी कुमारने इंग्लंडला दुसरा धक्का दिला आहे. कॅप्टन टॉम प्रेस्टला भोपळाही फोडू न देता रवी कुमारने तंबूत धाडलं. त्याला क्लीन बोल्ड केलं आहे. भारताने सलग चौथ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पाचव्यांदा वर्ल्डकप जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला आहे.
रवी कुमार कोण आहे?
रवी कुमारचे वडिल सीआरपीएफमध्ये असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. बांगलादेश विरुद्धच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात रवी कुमार भारताच्या विजयाचा नायक ठरला होता. गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा रवी कुमारने बांगलादेश विरुद्ध पुरेपूर फायदा उचलला होता. रवी कुमारचा वेग आणि स्विंग गोलंदाजीचं बांगलादेशच्या फलंदाजांकडे उत्तर नव्हतं. सलामीवीर माहफिजूल इस्लामला त्याने ज्या चेंडूवर बोल्ड केलं, ती गोलंदाजी पाहून त्याच्याकडून भविष्यात निश्चित मोठ्या अपेक्षा बाळगता येऊ शकतात. आजही इंग्लंडविरुद्धच्या फायनलमध्ये रवी कुमार तशीच गोलंदाजी करतोय. रवी कुमारची गोलंदाजी पाहून काहींना झहीर खान तर काहींना न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टची आठवण येते.
24 वर्षानंतर इंग्लंड फायनलमध्ये
इंग्लंड 1998 नंतर दुसऱ्यांदा अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत खेळत आहे. 24 वर्षानंतर इंग्लंडने अंडर 19 वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली आहे. त्यांनी उपांत्यफेरीत अफगाणिस्तान नमवलं, तर भारताने तुल्यबळ ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे.