IND vs SL 1st ODI: टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये काल गुवाहाटीमध्ये पहिला वनडे सामना झाला. या मॅचमध्ये टॉप ऑर्डरच्या बॅट्समननी श्रीलंकन बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. विराट कोहलीने शतकी खेळी केली. टीम इंडियाने 50 ओव्हर्समध्ये सात विकेट गमावून 373 धावा चोपल्या. त्यानंतर गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोख बजावली. श्रीलंकन टीमला लक्ष्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. उमरान मलिकने यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने श्रीलंकेचे तीन विकेट काढले. या सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना सुदैवाने उमरानसोबत एक मोठी दुर्घटना टळली.
उमरानने किती विकेट काढल्या?
उमरानने या मॅचमध्ये 8 ओव्हर गोलंदाजी केली. त्याने 57 धावा देऊन तीन विकेट काढल्या. त्याने श्रीलंकेचा सलामीवीर पाथुम निसांकाला शतक पूर्ण करु दिलं नाही. निसांकाने 80 चेंडूत 72 धावा केल्या. त्याशिवाय चारिथा असालंकाला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. दुनित वेल्लागेची विकेटही त्याने काढली.
थोडक्यात टळली धडक
उमरान मलिकने फिल्डिंग करताना एक चूक केली. यामध्ये तो किंवा श्रेयस अय्यर गंभीर जखमी झाला असता. ज्यामुळे टीमला मोठा फटका बसला असता. युजवेंद्र चहल 32 वी ओव्हर टाकत होता. चहलच्या बॉलिंगवर वानिंदु हसारंगा वेगाने धावा बनवत होता. याच प्रयत्नात त्याने शेवटच्या चेंडूवर हवेत फटका खेळला. चेंडू डीप मिडविकेट लाँग ऑनला गेला. अय्यर लाँग ऑनला आणि मलिक मिडविकेटला उभा होता.
कॅच पकडली पण श्रेयस चिडला
दोघेही कॅच पकडण्यासाठी धावले. दोघे परस्परांना धडकणारच होते. पण मलिकने अय्यरला धावत येताना पाहिलं आणि मार्ग बदलला. अय्यरने कॅच पकडली पण तो उमरावर चिडला होता. हसारंगाने सात चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 16 धावा केल्या.
— IPLT20 Fan (@FanIplt20) January 10, 2023
श्रीलंकेचा कॅप्टन लढला
भारताने ठेवलेल्या विशाल लक्ष्यासमोर श्रीलंकन टीम फार काही करु शकली नाही. सातत्याने त्यांच्या विकेट्स गेल्या. पाथुम निसांकाशिवाय कॅप्टन दासुन शनाकाने लढत दिली. शनाकाने कासुन रचितासोबत मिळून नवव्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. पण टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. शनाकाने 88 चेंडूत नाबाद 108 धावा फटकावल्या. यात 12 चौकार आणि तीन सिक्स होत्या.