मुंबई: टीम इंडिया आणि श्रीलंकेत मंगळवारी पहिला T20 सामना झाला. या मॅचमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर 2 रन्सनी विजय मिळवला. श्रीलंकेने टीम इंडियाला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना विजय मिळू शकला नाही. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 162 धावा केल्या. श्रीलंकेच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 160 धावा केल्या. श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाकाने लढत देण्याचा प्रयत्न केला. पण उमरान मलिकच्या एका वेगवान चेंडूने शनाकाचा खेळ संपवला. उमरान मलिक वेगासाठी ओळखला जातो. या मॅचमध्ये त्याचा तोच अंदाज पहायला मिळाला.
शनाकाची जबरदस्त बॅटिंग
शनाका क्रीजवर असताना, श्रीलंकेच्या विजयाची शक्यता दिसत होती. पण कॅप्टन आऊट होताच टीमला झटका बसला. चरिथा असालंकाने टीमला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. शनाकाने 27 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. असालंकाने 16 चेंडूत 23 धावा केल्या.
155 KMPH ने संपवला खेळ
श्रीलंकेचा कॅप्टन वेगाने धावा बनवत होता. त्यावेळी कॅप्टन हार्दिक पंड्याने 17 व्या ओव्हरमध्ये उमरान मलिकच्या हाती चेंडू सोपवला. मलिकने या ओव्हरमध्ये चौथ्या चेंडूवर शनाकाला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. शनाकाने उमरानचा ऑफ स्टम्प बाहेरचा चेंडू कव्हर्सच्या वरुन मारण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. युजवेंद्र चहलच्या हाती त्याने सोपा झेल दिला.
The fastest ball by an Indian bowler clocking 155kmph #INDvsSL #UmranMalikpic.twitter.com/xRTDSpdTet
— Anand Raj (@sports_anand) January 4, 2023
उमरानने याआधी किती वेगात चेंडू टाकलाय?
उमरानने आपल्या वेगाचा हुशारीने वापर केला. उमरानने शनाकाला ज्या चेंडूवर बाद केलं, त्याचा वेग 155 KMPH होता. उमरानने यापेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकलेत. आयपीएल 2022 मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना त्याने 157 किमीप्रतितास वेगाने गोलंदाजी केलीय. न्यूझीलंड विरुद्ध 25 नोव्हेंबरला उमरानने 153.1 किमी प्रतितास वेगात चेंडू टाकलाय.
उमरानची कमाल
या मॅचमध्ये उमरानने आपल्या वेगाने मन जिंकलं. उमरानने चार ओव्हर्समध्ये 27 धावा देऊन दोन विकेट काढल्या. उमरानचा हा चौथा टी 20 सामना होता. या चार सामन्यात उमरानच्या नावावर चार विकेट आहेत.