नागपूर – देशात सध्या रणजी ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. अनेक गुणवान युवा खेळाडू रणजीमध्ये आपल्या खेळाने छाप उमटवत आहेत. टीम इंडियाच्या बाहेर गेलेले काही खेळाडू पुनरागमनसाठी जोरदार प्रदर्शन करतायत. शतक-द्विशतक झळकावत आहेत. पण त्याचवेळी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत काही धक्कादायक निकालांची नोंद होत आहे. रणजी ट्रॉफीच्या एका सामन्यात फक्त 73 धावांच लक्ष्य एका टीमला झेपलं नाही. खरंतर 73 रन्स हे खूप सोपं टार्गेट आहे. पण विदर्भ विरुद्ध गुजरात सामन्यात 73 रन्स हे कठीण टार्गेट बनलं. विदर्भाच्या टीमने गुजरातला 18 धावांनी हरवलं.
रणजी ट्रॉफीत एक नवीन रेकॉर्ड
विदर्भाने गुजरातला विजयासाठी फक्त 73 रन्सच टार्गेट दिलं होतं. पण गुजरातची टीम फक्त 54 धावात ऑलआऊट झाली. जामथा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरातचा फक्त एक फलंदाज दोन आकडी धावा करु शकला. स्पिनर आदित्य सरवटे विदर्भाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने पहिल्या इनिंगमध्ये पाच विकेट घेतल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये या बॉलरने 6 विकेट काढल्या. विदर्भने गुजरातवर हा विजय मिळवून रणजी ट्रॉफीत एक नवीन रेकॉर्ड रचलाय.
‘या’ टीम्सनी कमी धावांचा यशस्वी बचाव केला
विदर्भाची टीम रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात कमी धावांचा बचाव करणारी टीम बनली आहे. याआधी हा रेकॉर्ड 78 रन्सचा होता. 1949 साली बिहारच्या टीमने दिल्ली विरुद्ध 78 धावांच्या लक्ष्याचा बचाव केला होता. 2017 साली रेल्वेने उत्तर प्रदेश विरुद्ध 94 धावांच्या टार्गेटचा बचाव केला होता.
विदर्भाचा चत्मकारीक विजय
विदर्भाची टीम मॅचच्या पहिल्यादिवशी पराभवाच्या उंबरठ्यावर होती. विदर्भाने पहिल्या डावात फक्त 74 धावा केल्या होत्या. गुजरातने पहिल्या इनिंगमध्ये 256 धावा केल्या. म्हणजे गुजरातला विदर्भावर 172 धावांची मोठी आघाडी मिळाली होती.
त्याबद्दल कोणीच विचार केला नव्हता
विदर्भाच्या फलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्येही विशेष कमाल केली नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये विदर्भाचा डाव 254 धावांवर संपुष्टात आला. गुजरातसमोर विजयासाठी फक्त 73 धावांच लक्ष्य होतं. हे खूपच सोपं टार्गेट होतं. पण यानंतर जे घडलं, त्याबद्दल कोणीच विचार केला नव्हता.
गुजरातच सरेंडर
गुजरातने दुसऱ्या डावात पहिला विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये गमावला. त्यानंतर जणू विकेटची रांगच लागली. सरवटे आणि हर्ष दुबेने वाट लावून टाकली. गुजरातचे 5 फलंदाज अवघ्या 34 धावात तंबुत परतले. गुजरातच्या लोअर ऑर्डरला हा दबाव पेलवला नाही. 54 धावात गुजराची टीम ऑलआऊट झाली.