अहमदाबाद: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचा आज अंतिम सामना झाला. महाराष्ट्र आणि सौराष्ट्रची टीम आमने-सामने होती. महाराष्ट्राने पहिली बॅटिंग केली. कॅप्टन ऋतुराज गायकवाडच्या झुंजार (108) शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने 9 बाद 248 धावा केल्या. सौराष्ट्राने 46.3 ओव्हरमध्ये विजयी लक्ष्य गाठलं. सौराष्ट्राच्या टीमने महाराष्ट्रावर 5 विकेट आणि 21 चेंडू राखून विजय मिळवला.
सौराष्ट्राची दमदार सलामी
महाराष्ट्राने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्राने दमदार सुरुवात केली. हार्विक देसाई आणि शेल्डन जॅक्सनच्या जोडीने 125 धावांची सलामी दिली. हार्विकला बोल्ड करुन मुकेश चौधरीने ही जोडी फोडली. हार्विकने (50) धावा केल्या. त्यानंतर जय गोहीलला लगेचच मुकेश चौधरीने शुन्यावर बाद केलं.
जॅक्सन-चिराग जोडीकडून विजयावर शिक्कामोर्तब
त्यानंतर ठराविक अंतराने सौराष्ट्राचे फलंदाज बाद झाल्याने त्यांचा डाव अडचणीत येईल असं वाटलं होतं. पण चिराग जानी आणि शेल्डन जॅक्सनने नाबाद 57 धावांची भागीदारी करुन विजयावर शिक्कामोर्तब केलं. शेल्डनने 136 चेंडूत नाबाद 133 धावा केल्या. यात 12 चौकार आणि 5 षटकार आहेत. चिरागने 25 चेंडूत नाबाद 30 धावा करताना 3 चौकार लगावले.
फायनलमध्ये ऋतुराजचा तोच अंदाज
आज सौराष्ट्राविरुद्ध फायनल मॅचमध्येही ऋतुराजचा तोच अंदाज पहायला मिळाला. ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये महाराष्ट्राकडून शतक ठोकलं. या टुर्नामेंटमधील मागच्या 5 इनिंग्समधील त्याने झळकावलेलं सलग तिसरं शतक आहे. या टुर्नामेंटमध्ये ऋतुराज गायकवाड भन्नाट फॉर्ममध्ये आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये ऋतुराजने 131 चेंडूत 108 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 4 षटकार आहेत.
फायनलमध्ये हॅट्रिक
आज विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये हॅट्रिक पहायला मिळाली. सौराष्ट्राचा गोलंदाज चिराग जानीने ही हॅट्रिक घेतली. चिराग जानीने महाराष्ट्राविरुद्ध 10 ओव्हर्समध्ये 43 धावा देऊन 3 विकेट काढल्या. त्याला हॅट्रिकच्या बळावर हे तिन्ही विकेट मिळाले. त्याची ही व्यक्तीगत शेवटची ओव्हर होती. महाराष्ट्राच्या इनिंगमधील 49 व्या षटकात ही हॅट्रिक झाली. त्याने एसएस नवालेला आधी आऊट केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर हंगरगेकर आणि तिसऱ्या चेंडूवर ओस्तवालची विकेट काढली. महाराष्ट्राच्या लोअर ऑर्डरमधील फलंदाजांचे हे तिन्ही विकेट होते.